हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि राजापूर एस्.टी. आगार यांचा संयुक्त उपक्रम
राजापूर, ११ ऑक्टोबर (वार्ताहर) – येथील परिसरात धार्मिक यात्रेला चालना मिळावी, या उद्देशाने येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजापूर आगाराच्या सहयोगाने रविवार, १५ ऑक्टोबरपासून चालू होणार्या शारदीय नवरात्रौत्सव काळात ‘नवदुर्गा दर्शन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीत प्रतिदिन सवलतीच्या दरात तालुक्यातील प्रमुख नवदुर्गा दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन सकाळी ७ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत दर्शन यात्रा असणार आहे.
या यात्रेत तालुक्यातील पेंडखळे येथील श्री जाकादेवी, देवीहसोळ श्री आर्यादुर्गा, आडीवरे येथील श्री महाकाली, कशेळी येथील श्री जाकादेवी, वेत्ये येथील श्री कालिकामाता, नाटे येथील श्री नवलादेवी, होळीची ग्रामदेवता श्री भरतदुर्गादेवी, माडबनची श्री भगवतीदेवी, मिठगवाणेची ग्रामदेवता श्री मुहूर्तादेवी यांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
या दर्शनयात्रेकरता प्रतिदिन सकाळी ७ वाजता जवाहर चौक राजापूर येथून एस्.टी. बस निघेल आणि नऊ दुर्गादेवींचे दर्शन घेऊन सायंकाळी ७.३० वाजता जवाहर चौक राजापूर येथे परत येईल. या एका दिवसाच्या यात्रेकरता पुरुष भाविकांना रुपये ४४४, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना रुपये ३३३ आणि अमृतानुभव भक्तांना रुपये २२२ अशा सवलतीच्या दरात यात्रेची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
यातील सहभागी भाविकांना प्रवासादरम्यान रुपये १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, सकाळी चहा, न्याहारी, दुपारी भोजन आणि सायंकाळी चहाची सोय केली जाणार आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाच्या ठिकाणी त्या त्या देवतेची महती सांगणारा मार्गदर्शक (गाईड) सोबत असणार आहे. तर सहभागी महिला भाविकांना प्रतिदिन एका भाग्यवान महिलेला ‘मानाची साडी’ भेट देण्यात येणार आहे. भाग्यवान महिलेची निवड सोडत पद्धतीने केली जाणार आहे.
अधिकाधिक भाविकांना तालुक्यातील या नऊ दुर्गांचे नवरात्रीच्या पर्वणी काळात दर्शन घेता यावे, या उद्देशाने हा नवदुर्गा दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी सांगितले. या उपक्रमाला ‘माय राजापूर’ या संस्थेचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.
ज्या भाविकांना या दर्शन यात्रेत सहभागी व्हावयाचे आहे. अशांनी त्यांची आगावू नाव नोंदणी करणे आवश्यक असून नावनोंदणीसाठी स्वत:चे आधारकार्ड सह महेश मयेकर (९४२२४२५७४०), मोहन घुमे (९४२२७६३०३२), मंदार बावधनकर (८९८३७५७२७३) विवेक गुरव (८५५४०८९२६७) श्रीम. शुभांगी पाटील (९७६५३४०४७९) अनिल कुवेस्कर (९४२११ ४३५५८) सचिन मोरे (९४०४३ ३१९७९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजापूर एस्.टी. आगार आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.