Amol Mitkari on Ravan :आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रावणाच्या मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी !

अमोल मिटकरी

अकोला – दसर्‍याच्या दिवशी प्रथा परंपरेनुसार रावणाचे दहन केले जाते; परंतु आजही अनेक भागात रावणाला देव मानले जाते. विशेषत: आदिवासी समाजात रावणाची पूजा केली जाते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला येथील पातूर तालुक्यात असलेल्या सांगोळा येथे रावणाचे मंदिर असून येथील धर्म सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये देण्यात आले आहे.

सौजन्य: झी २४ तास

(आज हिंदू संघटित नसल्यामुळेच आमदार अमोल मिटकरी यांच्यासारखे लोकप्रतिनिधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळत आहेत. ‘असे केल्यावर मोठी प्रसिद्धी मिळते’, अशी लोकप्रतिनिधींची धारणा झाली आहे. हे चित्र पालटण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक)

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की

१. एखाद्या राजकीय नेत्याच्या पुतळ्याचे दहन करायचे असेल, तर त्याला पोलीस अनुमती लागते. ‘रावण हा राक्षसांचा राजा होता’, असे पुस्तकात आहे. अनेक ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत. सांगोळा गावात रावणाची मूर्ती आहे. दसर्‍याच्या दिवशी येथील लोक रावणाचे दहन करत नाहीत.

२. आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे. त्यामुळे त्याची दैवते ही प्रत्येकाची दैवते असतात. त्यामुळे रावण दहन करणार्‍यांच्या हाती श्रीरामाचे गुण अंगी असायला हवेत. (स्वतःच्या अंगी श्रीरामाचे किती गुण आहेत ? हे अमोल मिटकरी यांनी प्रथम सांगावे ! – संपादक)

३. रावण चारित्र्यवान, प्रकांड पंडित, शिवभक्त आणि अभ्यासू होता. (सीतेचे अपहरण करणारा, देवतांना त्रास देणार्‍या, तसेच अनेक ऋषिमुनी आणि भक्त यांची हत्या करणार्‍या रावणाची स्तुती करणारे लोकप्रतिनिधी हिंदूंचे कधीतरी कल्याण करतील का ? – संपादक)

४. येणार्‍या हिवाळी अधिवेशनात मी स्वतः रावण दहन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यासाठी अधिकृत शासन निर्णय व्हावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. (मिटकरी यांच्या विरोधात हिंदु आमदारांनी संघटित होऊन हिवाळी अधिवेशनात त्यांच्या मागणीला कडाडून विरोध करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे ! – संपादक) कुणीही रावण दहन करू नये.

५. आदिवासी समाजाच्या दैवताचा अवमान हा एकप्रकारे आदिवासी समाजाचा अवमान आहे. (अशा कृत्यामुळे श्रीरामाची पूजा करणार्‍या हिंदूंचाही अवमान होतो, त्याविषयी मिटकरी का बोलत नाहीत ? – संपादक) त्यामुळे या प्रथेला कायम निर्बंध घातले पाहिजे. अशा प्रकारे मी प्रयत्न करणार आहे. भारतभर रावणाची बर्‍याच ठिकाणी पूजा होते. रावणाने कधी कुणाला त्रास दिला नाही. दुर्दैवाने अनेक कथा रंगवल्या जातात. (अमोल मिटकरी यांचे भाषण म्हणजे ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः ।’ असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • देव सोडून दानवाचे उदात्तीकरण करणारे लोकप्रतिनिधी समाजात असतील, तर समाजात सुख आणि शांती कशी नांदेल ?
  • आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?