मुंबई – दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी २४ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सभेद्वारे शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर, तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर स्वतंत्रपणे हा दुसरा मेळावा झाला. मागील वर्षी शिंदेगटाचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर झाला होता. यावर्षी होत असलेल्या या दोन्ही मेळाव्यांची पार्श्वभूमी आणि दसर्यानिमित्त श्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक यांमुळे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि लोकसभा अन् विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्यांद्वारे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून करण्यात आला.