लांजा येथे श्री दुर्गामाता दौडीची यशस्वी सांगता

लांजा – नवरात्रीमध्ये दुर्गादेवीने महिषासुरासमवेत युद्ध केले आणि दसर्‍याला विजयश्री प्राप्त केली. सद्य:स्थितीत हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्यावरही आक्रमण होत आहेत. अशी आक्रमणे करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी येथील बजरंग दलाच्या वतीने श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या प्रेरणेतून येथे ही श्री दुर्गामाता दौड सलग दुसर्‍या वर्षी काढण्यात आली.

घटस्थापना ते विजयादशमी या १० दिवसांत लांजा शहरातील प्रत्येक भागामध्ये श्री दुर्गामाता दौड प्रतिदिन आयोजित केली होती. प्रतिदिन सकाळी ६ वाजता ‘महात्मा बसवेश्वर चौक’ या ठिकाणावरून ही दौड ध्येयमंत्र म्हणून मार्गक्रमण करत असे. प्रारंभी दौड हळूहळू धावत गावातील प्रत्येक देवळात जात असे. या वेळी धारकरी देशभक्तीपर घोषणा देत. दौडीच्या मार्गात अनेक सुहासिनी ध्वज धरणार्‍याचे आणि ध्वजाचे हळद-कुंकू लावून औक्षण करत असत. या दुर्गादौडीचे अनेक ठिकाणी मंगलवाद्ये, ताशा, ढोल यांचे वादन करून स्वागत केले जाई.


नवव्या दिवशीच्या दौडी दरम्यान रत्नागिरी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अधिवक्ता अमित काटे यांनी देशभक्तीपर मार्गदर्शन केले. या दौडीमध्ये शहरातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत. या दौडीमुळे लांजा शहरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले. कुणालाही कोणताही अडथळा निर्माण न करता ही श्री दुर्गामाता दौड १० दिवस उत्साहात पार पडली. ही दौड यशस्वी होण्यासाठी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि उत्कृष्ट नियोजन केले.