अ. Deepdan : यमदीपदान : आश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या दिवशी यमदीपदान केले जाते. अपमृत्यू येऊ नये; म्हणून या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. सायंकाळी दक्षिणेकडे ज्योत करून पणती लावून तिची गंध, हळदकुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य या उपचारांनी पूजा करून पुढील श्लोक म्हणतात
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ॥
अर्थ : त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा, काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे.
ही प्रार्थना करून यमदीपदान करावे, तसेच या दिवशी दागिने, मौल्यवान वस्तू, श्रीविष्णु-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग या द्रव्यनिधी देवतांचेही पूजन केले जाते.
आ. Chopda Poojan : चोपड्यांचे पूजन : धनत्रयोदशी हा दिवस विशेषतः व्यापारीवर्गाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचे नवीन वर्ष धनत्रयोदशीला चालू होते. या दिवशी समस्त लहान-मोठे व्यापारी त्यांच्या चोपड्यांची म्हणजेच हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. मागील वर्षाचे हिशोब पूर्ण करून नव्या वर्षाच्या नव्या वह्यांची पूजा केली जाते. धनाची पूजा आणि यमदेवतेला दीपदान यातून व्यवहार अन् अध्यात्म यांचा सुरेख संगम साधला गेला आहे.
इ. Dhanvantari : धन्वंतरि पूजन : याच दिवशी धन्वंतरि जयंतीही साजरी केली जाते. सर्व रोग नाश करून आरोग्य प्रदान करणार्या विविध औषधींचा निर्माणकर्ता, लोकांची रोग, म्हातारपण आणि मृत्यू यांविषयीची भीती नाहीशी करणार्या अन् मनुष्यच नव्हे, तर सर्व देव आणि असुर ज्याला नेहमी वंदन करतात, त्या आदिदेव धन्वंतरिचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
धन्वंतरी देवाच्या या मंत्राचे नित्य पठण केले असता आपल्या शरिरातील सर्व दोष नाहीसे होऊन आरोग्य आणि मनःशांती प्राप्त होते. मृत्यूविषयीची भीती नाहीशी होते.
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)