‘१६.९.२०२३ या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी सकाळी पावणे सहा वाजता श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांना भ्रमणभाष केला. भ्रमणभाषचा ‘स्पीकर’ (ध्वनीवर्धक) चालू होता. त्यांच्यामधील संभाषणाच्या वेळी मला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवसानिमित्त झालेला भ्रमणभाषवरील संवाद म्हणजे ‘कैलाश पर्वतावरील शिव-पार्वतीचा संवाद आहे’, असे वाटणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सद्गुरु गाडगीळकाकांना वाढदिवसानिमित्त भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनीही त्यांना नमस्कार केला. त्यांचे बोलणे चालू असतांना मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पलंगाच्या बाजूला खाली बसलो होतो. त्यांचे बोलणे मी डोळे बंद करून ऐकत होतो. तेव्हा मला ‘त्यांचे बोलणे शिवलोकामध्ये, म्हणजे कैलास पर्वतावर चालू आहे. ते दोघे एकमेकांपासून दूर अंतरावर नसून, बाजूबाजूला बसून बोलत आहेत, तसेच शिव-पार्वतीच एकमेकांशी बोलत आहेत आणि मी त्यांच्या समोर बसून त्यांचे बोलणे ऐकत आहे’, असे मला जाणवले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळे देवाने मला कैलास पर्वताचे दर्शन घडवले’, असे वाटले.
२. संभाषण ऐकत असतांना मन पूर्णपणे निर्विचार आणि शांत होऊन भावजागृती होणे
संभाषण चालू असतांना तेथे ‘आम्ही तिघेच होतो’, असे मला दिसले. हे संभाषण ऐकत असतांना माझे मन पूर्णपणे निर्विचार आणि शांत झाले होते. हे सर्व पाहून माझी भावजागृती होत होती. ‘त्यांचे ते बोलणे एवढे छान होते की, ते संपूच नये’, असे मला वाटत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दामधून वातावरणात चैतन्य पसरत होते.
३. सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या मनात एकमेकांविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव असणे
त्यानंतर सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘तुम्हा गुरूंचा मला आशीर्वाद मिळो’, अशी मी प्रार्थना करतो.’’ त्यांच्या या बोलण्यावरून ‘ते श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पत्नीच्या रूपात न पहाता गुरुरूपात पहातात’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘तुम्हाला परम पूज्य गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद आहे ना !’’ तसे पाहिले, तर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आम्हा सर्वांना गुरुस्थानी आहेत; पण त्यांना त्याचा कुठलाही अहं नाही. दोघेही नेहमी एकमेकांशी बोलतांना कृतज्ञताभावात बोलत असतात.
४. आम्हा सर्व साधकांसाठी त्यांचे रहाणीमान आदर्श आहे. ‘ते दोघेही अध्यात्माच्या उच्च टप्प्याला असूनही साधेपणाने रहातात’, हे मला शिकायला मिळाले.
५. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी सद्गुरु गाडगीळकाकांचे कौतुक करणे
त्यांचे बोलणे झाल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू मला म्हणाल्या, ‘‘काका अगोदरपासून व्रतस्थ आहेत. पहिल्यापासूनच त्यांना सर्व नीटनेटके आणि स्वच्छ आवडते अन् ते तसे ठेवतात. त्यांच्यामध्ये पहिल्यापासून पुष्कळ गुण आहेत. आता त्यांच्या चैतन्यामध्ये वाढ झाली आहे.’’ अशा शब्दांमध्ये त्या त्यांचे कौतुक करत होत्या.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू, तुमचे हे आदर्श जीवन आम्हा साधकांना शिकता येऊन तुम्हीच आम्हा सर्वांकडून साधना करून घ्या, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना.’
– श्री. वाल्मिक भुकन, देहली (१८.९.२०२३)
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अध्यात्माची शाश्वतता दर्शवणारे अनमोल विचार !‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी राजकारण आणि अध्यात्म यांतील भेद स्पष्ट करून अध्यात्म जगण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. १. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्या व्यक्तीला दायित्व दिले जाते. इ. राजकारणात क्षणिक सुख असते. २. अध्यात्मातील शाश्वतता अ. अध्यात्मात भक्ताची श्रद्धा भगवंतावर असते. भगवंत जे देईल, ते भक्त आनंदाने स्वीकारतो आणि त्यात तो समाधानी असतो. आ. भक्ताला भगवंताचे संरक्षण असते. त्यामुळे भक्ताला काळाची मर्यादा नसते. भगवंत भक्तांची काळजी भक्त जिवंत असतांना तर घेतोच, तसेच भक्ताच्या मृत्यूनंतरही घेतो. भक्ताला पुढच्या लोकांत घेऊन जाण्याचे (पुढची गती देण्याचे) दायित्व भगवंत घेतो. इ. अध्यात्मात युगानयुगे टिकणारा परमानंद असतो.’ – संग्राहक : श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (८.९.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |