ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728412.html

(भाग २)

१. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

पू. (सौ.) संगीता जाधव

१ अ. श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची ओढ लागली आहे ! : ‘जसे आपले मन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या दिव्य चरणी समर्पित होण्यासाठी आतुरले आहे, अगदी तशीच ओढ श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची लागली आहे. त्यांची आपल्यावर एवढी प्रीती आहे की, त्यांनाच आपल्याला डोळे भरून पहायचे आहे. तेच आपली वाट बघत आहेत. खरेतर आपण भक्तही नाही. आपल्याला आपल्या साधनेची स्थिती ठाऊक आहे, तरीही तो भगवंत आपली वाट बघत आहे.

१ आ. श्री गुरूंनी साधकांसाठी निर्माण केलेले सप्तलोकरूपी दिव्य वातावरण अनुभवण्यासाठी साधकांनी गुरूंकडे दिव्य दृष्टी मागावी ! : श्रीविष्णुस्वरूप श्री गुरूंनी ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांना सप्तलोकरूपी दिव्य वातावरण अनुभवायला देण्याचे नियोजन केले आहे. ते अनुभवता येण्यासाठी आपण त्यांच्याकडेच दिव्य दृष्टी मागूया. आपल्यामध्ये भगवंताप्रती भाव निर्माण करूया. आपण भावाच्या स्तरावर सतत प्रयत्न करूया. ब्रह्मोत्सवाच्या वेळचे दिव्य वातावरण अनुभवण्यासाठी आपली धडपड असायला हवी. आपल्या मनात येऊ शकते, ‘या काही दिवसांत आपल्यामध्ये हे कसे निर्माण होईल ?’; पण आपण लक्षात घेऊया, ‘आपल्या जीवनात प्रत्यक्ष श्रीविष्णुस्वरूप गुरु आले आहेत आणि ते काहीही करू शकतात. आपल्या कितीतरी पापांचे डोंगर आणि आपले संचित, प्रारब्ध एका क्षणात नष्ट करून ते आपल्याला दिव्य दृष्टी देऊ शकतात अन् त्यांनी जे सूक्ष्मातून निर्माण केले आहे, ते सर्व अनुभवायला देऊ शकतात.’

१ इ. गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर अनुभवता येण्यासाठी भगवंताला प्रार्थना करा ! : आपल्यातील भाव वाढण्यासाठी, श्री गुरूंना शरण जाण्यासाठी आणि आपल्यात याचकभाव निर्माण होण्यासाठी आपल्या जिवाची घालमेल व्हायला हवी. त्यासाठी भगवंताला प्रार्थना करावी, ‘भगवंता, तू जे सप्तलोक निर्माण केले आहेस, ते माझे मन आणि बुद्धी यांना अनुभवता येऊ दे. माझा विवेक जागृत होऊ दे. माझे डोळे तू इतके तेजस्वी बनव आणि मला इतकी शक्ती दे की, मला हे सर्व अनुभवता येईल.’

१ ई. साधनेचे सर्व प्रयत्न मनापासून करा आणि स्थुलासह सूक्ष्मातील ब्रह्मोत्सव अनुभवण्याचा प्रयत्न करा ! : आपण आतापासून अहं निर्मूलन आणि भावजागृती यांसाठी मनापासून प्रयत्न करूया. आपण देवाला सांगूया, ‘देवा, मला आता तुला अनुभवायचे आहे. तू पृथ्वीवर आला आहेस. तू मला जे द्यायचे ठरवले आहेस, ते मला आता घ्यायचे आहे.’ त्या दृष्टीने साधनेविषयीची सूत्रे कृतीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपण लहानात लहान होऊन (न्यूनता घेऊन) भगवंताला अनुभवण्याचा प्रयत्न करूया. आपल्या हातांत आणखी पुष्कळ घंटे आहेत. त्या घंट्यांमध्ये आपण भगवंताला अनुभवू शकतो. भगवंत आपल्याला दिव्य दृष्टी देऊ शकतो आणि आपण ब्रह्मोत्सव सूक्ष्मातून अनुभवू शकतो. आपल्याला केवळ स्थुलातीलच नाही, तर सूक्ष्मातीलही अनुभवायचे आहे.

उ. ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी बसने एकत्रित प्रवास करत असतांना इतरांचा विचार करून ‘त्यागातच खरा आनंद आहे’, हे अनुभवा ! : आपण एकत्रित श्री गुरूंच्या दर्शनाला जाणार, तर आपल्यात संघटितपणा आणि समष्टी भाव असायला हवा. आपण व्यष्टी साधनेचे पुष्कळ चांगले प्रयत्न करूया. दुसर्‍यांचा विचार करूया. कोणतीही कृती करतांना इतरांना महत्त्व देऊया आणि स्वतः न्यूनता घेऊन प्रयत्न करूया. आपल्याला सुविधा उपलब्ध झाल्या नाही, तरी चालतील; पण ‘इतरांना सुविधा कशा उपलब्ध होतील ?’, याचा विचार व्हायला हवा, उदा. ‘आपल्याला बसमध्ये खिडकीजवळची किंवा पुढची आसंदी (सीट) मिळाली नाही, तरी चालेल; पण इतरांना मिळायला हवी. मला अंघोळीसाठी गरम पाणी मिळाले नाही, तरी चालेल; पण ‘इतरांना ते कसे मिळेल ?’, असा विचार करायला हवा. यातून ‘त्यागातच खरा आनंद आहे’, हे गुरुमाऊली आपल्याला अनुभवायला देणार आहेत.

२. पू. (सौ.) संगीता जाधव यांचे मार्गदर्शन ऐकल्यावर साधकांमध्ये झालेले पालट

२ अ. साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढणे : पू. जाधवकाकूंच्या मार्गदर्शनामुळे साधकांना ब्रह्मोत्सवाला जाईपर्यंतच्या कालावधीत प्रयत्न करण्याची दिशा मिळाली आणि साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न अन् त्यांची गुरुदेवांच्या दर्शनाची ओढ वाढली. ‘प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला जायचे आहे’, या विचाराने साधकांकडून गुरुदेवांचे स्मरण आपोआप होऊ लागले. त्यांना गुरुदेवांच्या संदर्भात अनुभूती येऊ लागल्या. त्यांच्या आनंदात वाढ झाली आणि त्यांच्यात गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. पू. जाधवकाकूंनी सांगितलेल्या ‘कृतज्ञताभाव आणि याचकभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, गुरूंनी सांगितलेली सेवा तळमळीने करणे, अधिकाधिक त्याग होण्यासाठी प्रयत्न करणे, स्वतःकडे न्यूनता घेणे’, या सूत्रांनुसार साधकांचे प्रयत्न वाढले.

२ आ. काही साधकांच्या अनेक अडचणी असूनही पू. (सौ.) संगीता जाधव यांचे मार्गदर्शन ऐकल्यावर त्यांनी अडचणींवर मात करून सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेणे : काही साधकांना सोहळ्याला येण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणी होत्या. काही साधकांना वाटत होते, ‘एवढा उन्हाळा आपल्याला सहन होईल का ? घरातील अन्य व्यक्ती आपल्याला एवढ्या दूर पाठवतील का ? २ दिवस सुटी मिळेल का ? एवढ्या लांबचा प्रवास झेपेल का ? बसण्याची आणि रहाण्याची व्यवस्था कशी असेल ? एवढे घंटे बसायला जमेल का ? सोहळ्याला एवढी गर्दी असेल, तर गुरुदेवांचे दर्शन व्यवस्थित होईल का ? त्यापेक्षा संगणकीय प्रणालीद्वारे सोहळा घरी बघूया.’ त्यामुळे काही साधकांनी गोवा येथे जाण्याचे नियोजन केले नव्हते; मात्र पू. काकूंचे मार्गदर्शन ऐकल्यावर अनेक साधकांनी अडचणींवर मात करून सोहळ्याला येण्याचा निर्णय घेतला.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. वैभवी सुनील भोवर (आध्याित्मक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), सौ. ऋचा किरण सुळे आणि सौ. मानसी जोशी, मुंबई. (११.६.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.