‘साधकांना आध्यात्मिक स्तरावर ब्रह्मोत्सव अनुभवता यावा’, यासाठी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

‘महर्षींच्या आज्ञेने गोवा येथे होत असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील साधक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतात’, ही आनंदवार्ता समजल्यावर सर्व साधकांना अतिशय आनंद झाला. ‘आपल्या प्राणप्रिय गुरुमाऊलीला प्रत्यक्ष पहाता येणार’, या जाणिवेने साधकांची भावजागृती होत होती. ‘या अविस्मरणीय सोहळ्याचा साधकांना आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ करून घेता यायला हवा’, अशी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची पुष्कळ तळमळ होती. ‘साधकांनी साधनेचे प्रयत्न कसे वाढवायला हवेत ? साधक ब्रह्मोत्सवाचा लाभ अधिकाधिक कसा घेऊ शकतील ? ब्रह्मोत्सवासाठी जाणार्‍या साधकांचा प्रवास आध्यात्मिक स्तरावर होऊन साधक सतत भगवंताच्या अनुसंधानात कसे रहातील ? त्यांच्यात श्री गुरूंना अपेक्षित असा समष्टी भाव कसा जागृत राहील ?’, यांकडे त्यांचे सतत लक्ष होते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचा साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता यावा, ब्रह्मोत्सवाचे अनमोल क्षण साधकांच्या अंतरी कायमस्वरूपी कोरले जावेत’, यासाठी साधकांनी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना अनमोल मार्गदर्शन केले. ते पुढे दिले आहे.  

पू. (सौ.) संगीता जाधव
सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

(भाग १)

१. ‘प.पू. गुरुदेवांच्या ‘न भूतो न भविष्यति ।’, अशा सोहळ्याला उपस्थित रहायला मिळणे’, हे साधकांचे अहोभाग्यच आहे !  

भगवंताने योजलेला प.पू. गुरुदेवांचा हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा होणार आहे. असा सोहळा सनातन संस्थेच्या इतिहासात पूर्वी कधी झाला नव्हता आणि ‘पुन्हा कधी होईल ?’, याची आपल्याला कल्पना नाही. हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. जे साधक या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत, त्यांचे भाग्य फळाला आले आहे. ज्या साधकांना काही कारणास्तव या सोहळ्यासाठी येता येणार नाही, त्यांनी भगवंताच्या चरणी आर्ततेने प्रार्थना केली, तरीही गुरुदेव त्यांना वैकुंठाचे दर्शन घडवतील.

२. प.पू. गुरुदेवांनी आजपर्यंत आपल्यावर केलेल्या अनंत कृपांचे स्मरण करून सतत कृतज्ञताभावात रहा !

साधकांना साधनेचे दिव्य ज्ञान प्रदान करून त्यांचे प्रारब्ध आणि संचित कर्म नष्ट करणारे अवतारी श्री गुरु आपल्याला लाभले आहेत. अशा महान श्री गुरूंच्या ब्रह्मोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘त्यांनी आजवर आपल्यासाठी किती केले आहे !’, याचे स्मरण करून आपण त्यांना सतत आळवूया आणि प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेवा, आपण आमच्यावर आजपर्यंत जी कृपा केली आहे, त्याविषयी आमच्या रोमारोमांत आणि पेशीपेशींत कृतज्ञताभाव जागृत होऊ दे. या ब्रह्मोत्सवामध्ये आपण आम्हाला देणार असलेल्या दर्शनाचा आम्हाला असा लाभ करून घेता येऊ देत की, आमचे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण होईल. कृतज्ञताभावाने भारित होऊन आम्हाला आपल्या चरणी समर्पित होता येऊ दे.’

३. साधकांनी स्वतःत याचकभाव निर्माण होण्यासाठी योग्य क्रियमाण वापरावे आणि श्री गुरूंचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे !  

‘कृतज्ञताभाव बाळगून श्री गुरूंना आत्मनिवेदन करणे, स्वतःत याचकभाव निर्माण करणे’, हे क्रियमाण प्रत्येकाने वापरायला हवे. ‘आपल्यात तसा भाव किती निर्माण होईल ?’, असा विचार न करता ब्रह्मोत्सवाच्या आधीचे जेवढे दिवस आणि जेवढे घंटे आपल्या हातांत आहेत, त्या कालावधीत ब्रह्मोत्सवासंबंधीची सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करूया. या कालावधीत आपण देवाला अपेक्षित अशी कृती होण्यासाठी प्रयत्न करूया. ‘ब्रह्मोत्सवाला गेलो, गुरुदेवांचे दर्शन घेतले आणि परत आलो’, असे आपले व्हायला नको. ‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्री गुरूंचे दर्शन घेऊन जन्मभरासाठी आपण कृतार्थ झालो, तृप्त झालो’, असे आपल्याला अनुभवता यायला हवे. त्यासाठी आपल्या मनामध्ये त्या टप्प्याचा भाव निर्माण व्हायला हवा.

४. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाचा लाभ मिळवण्यासाठी तळमळीने साधना आणि सेवा करा !  

गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव, म्हणजे गुरुदेव आणि त्यांचे भक्त यांच्या भेटीचा सोहळा आहे. भगवान विष्णुस्वरूप गुरुमाऊली सर्वांना स्थुलातून सारखेच दिसतील; मात्र त्यांच्या दर्शनाचा लाभ साधकांना त्यांच्या भावाप्रमाणे होणार आहे. त्यासाठी आपण आतापासून तळमळीने साधना आणि सेवा करूया. आपल्याकडून आतापर्यंत झालेल्या चुकांसाठी आपण गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना करूया.

५. श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भावस्पर्शी भेटीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले अन् साधक यांची होणारी अनुपमेय भेट !

‘ज्याप्रमाणे अनेक वर्षे श्रीकृष्णाची वाट पहाणारा सुदामा आणि अनेक वर्षे सुदाम्याची वाट पहाणारा श्रीकृष्ण यांची भेट भारावून टाकणारी होती, तशीच भेट भगवंत आपल्याला देणार आहे’, असे आपण या सोहळ्यात अनुभवणार आहोत. सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आतुरलेला होता. श्रीकृष्णाला भेटायला जातांना त्याच्या मनात पुढील विचार होते, ‘श्रीकृष्ण आपल्याला भेटेल का ? तो आता कसा दिसत असेल ? त्याच्या भेटीसाठी कितीही खडतर प्रवास झाला, तरी आपण तो प्रवास करून श्रीकृष्णाकडे जाऊया. आपल्या सख्याला एकदा तरी डोळे भरून पाहूया. त्याचे स्वरूप अनुभवूया. त्याची भव्यता आणि दिव्यता अनुभवूया.’
सुदाम्याच्या मनात केवळ एकच भाव होता, ‘मला एकदा तरी श्रीकृष्णाला डोळे भरून पहायचे आहे.’ त्याला वाटत होते, ‘मी भगवंताला पहायचे ठरवले आहे; पण भगवंत मला ओळखेल ना ? त्याची द्वारकानगरी कशी असेल ?’ त्याच्या मनातील या विचारांनी त्याचा प्रवास श्रीकृष्णमय झाला होता. सुदाम्याने तो ध्यास घेतला होता.

सुदामा द्वारकानगरीत आल्यावर त्याची श्रीकृष्णाशी अनुपमेय भेट होते. तेव्हा दोघेही भावविभोर होऊन एकमेकांची गळाभेट घेतात. श्रीकृष्णाला ‘सुदाम्याला कुठे ठेवू आणि कुठे नको ?’, असे वाटत होते अन् सुदाम्याला ‘श्रीकृष्णाला अंतरात किती साठवू ?’, असे वाटत होते. सर्व देवता भक्त आणि भगवंत यांची ही भेट पहातात अन् त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. असेच दृश्य गुरुदेव आणि सर्व साधक यांच्या भेटीत आपल्याला पहायला मिळणार आहे.  सुदाम्याला प्रश्न पडला, ‘भगवंतासाठी काय घेऊन जाऊ ?’, त्या वेळी सुदाम्याकडे काहीच नव्हते. सुदाम्याकडे जे मूठभर पोहे होते, ते त्याने श्रीकृष्णासाठी छोट्या पोटलीत (गाठोड्यात) बांधून नेले. त्याप्रमाणेच साधकांनी जी तुटपुंजी साधना केली आहे, त्यांच्याकडे जो भक्तीभाव, प्रेमभाव आणि तळमळ आहे, ती घेऊन साधक गुरुदेवांच्या भेटीला जाणार आहेत. कृष्णाचे वैभव पाहून सुदाम्याची स्थिती केविलवाणी होते. त्याला वाटते, ‘आपले पोहे श्रीकृष्णाला कसे द्यायचे ?’ साधक गुरूंना भेटतील, तेव्हा ते सुदाम्यासारखी स्थिती अनुभवतील.

श्रीकृष्ण सुदाम्याने आणलेले पोहे खाऊन तृप्त झाला. त्याने सुदाम्याला सर्व प्रकारचे वैभव दिले. त्याचप्रमाणे गुरुदेव साधकांना आयुष्यभर अनुभवता येईल, एवढा आनंद देणार आहेत. जेव्हा साधक गुरुदेवांना पहातील, तेव्हा साधकांच्याही मनात संकोच असेल, ‘आपल्याकडे तर काहीच नाही. आपण जे पोटलीतून आणले आहे, ते भगवंताच्या समोर काहीच नाही. आमच्याकडे एवढीशीच साधना आणि भाव आहे.’ जेव्हा साधक अशा दृष्टीने गुरुदेवांकडे पहातील, तेव्हा गुरुदेवांची कृपादृष्टी एवढी असेल की, ते आनंदाने साधकांच्या भक्तीभावाचा स्वीकार करतील. ते साधकांना इतके भरभरून देतील की, ते पाहून देवतांनाही साधकांचा हेवा वाटेल.
पू. (सौ.) संगीता जाधवकाकू मार्गदर्शन करत असतांना साधक सत्संगातील दैवी वातावरण, गुरुदेवांची कृपा आणि त्यांची प्रीती भावविभोर होऊन अनुभवत होते.’  (क्रमशः पुढच्या रविवारी)

– सौ. ऋचा किरण सुळे, कु. वैभवी सुनील भोवर आणि सौ. मानसी जोशी, मुंबई. (११.६.२०२३)