महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्‍या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते. दुर्गेचे स्तवन आणि पूजा करतांना अभिषेक प्रसंगी तिची नामावली म्हणतात. त्या नामावलीवरून स्त्रीच्या ठिकाणी कोणते गुण असावेत, याचा निर्देश झाल्याविना रहात नाही. या नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास येथे देत आहे.

१. महालक्ष्मी, मुंबई 

मुंबई येथील महालक्ष्मी

नवरात्रीमध्ये मुंबई शहरात जर कुठल्या देवीच्या दर्शनाला सर्वाधिक लोक जात असतील, तर ते महालक्ष्मीला होय. मुंबईत मुंबादेवी, गांवदेवी, प्रभादेवी, काळबादेवी इत्यादी प्राचीन प्रसिद्ध देवींची मंदिरे आहेत. या महालक्ष्मीचा वरदहस्त जणू मुंबईला लाभलेला आहे आणि मुंबईची समृद्धी अन् भरभराट सारखी वृद्धींगतच होत आहे. मुंबई शहरातील पश्चिमेकडील वाळकेश्वराच्या अलीकडच्या काही भागाला ‘महालक्ष्मी’ म्हणतात. याच ठिकाणी समुद्र किनार्‍यावर एका लहानशा टेकडीवर महालक्ष्मीचे ठिकाण आहे. या मंदिराची उभारणी सुद्धा सागरातूनच झाल्याची माहिती मिळते.

या मंदिराचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. मुंबई जेव्हा ७ स्वतंत्र टेकड्यांची होती, तेव्हा वरळी बेटावर वर्ष १७२० पर्यंत या महालक्ष्मीचे छोटेसे मंदिर होते; परंतु परकीय मुसलमानांच्या धार्मिक अत्याचाराच्या भीतीने तिच्या भक्तांनी देवीचे जवळच समुद्रात विसर्जन केले. मधल्या काळात मुंबईचे हस्तांतर पोर्तुगिजांकडून इंग्रजांना झाले. इंग्रजांच्या दूरदृष्टीने मुंबईचे महत्त्व जाणले होते; म्हणून मुंबई ही एकसंघ करण्यासाठी हळूहळू ही ७ बेटे जुळवण्याचे त्यांनी योजले आणि वरळीचा बांध घालण्यास आरंभ केला; पण त्या वेळी समुद्र हटवण्याचे कार्य काही केल्या पुरे होईना. बांधासाठी टाकण्यात आलेली दगड आणि माती सागराच्या लाटा आपल्या उदरात गडप करू लागल्या. त्यामुळे इंग्रज भांबावले. त्यांच्या मनात काम सोडण्याचे विचार डोकावू लागले. त्या वेळचे इंग्रजांचे इंजिनीयर रामजी शिवजी प्रभु यांना देवीने दृष्टांत दिला आणि ‘क्षीरसागरातून मला बाहेर काढून स्थापन करा’, असे सांगितले. प्रभु यांनी हा दृष्टांत तत्कालीन इंग्रज अधिकार्‍यांना सांगितला आणि समुद्रात जाळे टाकले. ते जाळे समुद्रात टाकताच त्यातून ३ काळ्या पाषाणांच्या देवीच्या मूर्ती बाहेर आल्या. त्या ३ मूर्ती म्हणजे आता मंदिरात स्थापन केलेल्या श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांच्या आहेत.

२. शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे 

शिवनेरीची शिवाई

पुण्यापासून ९४ किलोमीटरवर असलेल्या जुन्नर गावापासून ४ किलोमीटरवर शिवनेरी गडावर जाण्याचा मार्ग आहे. किल्ला चढून पहिल्या दरवाज्यातून वर जाताच शिवाईदेवीचे लहानसे मंदिर आहे. शिवाईदेवीची मूर्ती अडीच फूट उंचीची असून ती शेंदूर चर्चित आणि महिषासुरमर्दन स्वरूपाची आहे. हे स्थान देवी तुळजाभवानीचे असल्याचे मानण्यात येते. राजमाता जिजाबाईंनी याच देवीची उपासना केली आणि तिच्याच कृपाप्रसादाने झालेला पुत्र म्हणून त्याचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले. अक्षय्य तृतीया आणि नवरात्रीत येथे यात्रा भरते.

३. प्रतापगडची भवानीमाता, जिल्हा सातारा  

प्रतापगडची भवानीमाता

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला. यानंतर त्यांनी कृतज्ञतापूर्वक श्री भवानीमातेचे दर्शन घेतले. ज्या भवानीदेवीने विजय मिळवून दिला, तिची त्यांनी प्रतापगडावर प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील त्रिसूळ गंडकी, श्वेतगंडक आणि सरस्वती या नद्यांच्या संगम स्थानाची शिळा आणली अन् नेपाळमधील शिल्प कारागिरांकडून मूर्ती घडवून घेतली. या कामासाठी महाराजांनी मंबाजी नाईक-पानसरे यांची खास नेमणूक केली होती. देवीची प्रतापगडी विधीपूर्वक वर्ष १६६१ मध्ये स्थापना केली. मूर्ती काळ्या पाषाणाची आणि अष्टभुजा आहे. घाटमाथ्यावरून दरीत उतरल्यावर मुख्य मंदिर आढळते.

४. श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे हे पीठ आहे. ही देवी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी होती. कर्दभऋषींच्या भार्या अनुभूती ही तपश्चर्या करत असतांना कुकुट नामक दैत्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. त्या वेळी अनुभूतीने आदिशक्ती पार्वतीचा धावा केला, तेव्हा पार्वती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिने कुकुटाचा वध केला. ती त्वरित धावून आली; म्हणून ‘तुळजा-तुळजा’ नावाने ओळखली जाऊ लागली. ही देवी सिंहासनी आणि अष्टभुजा आहे. तिच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, धनुष्य इत्यादी आयुधे आहेत. मुकुटावर मोती आणि लिंग यांच्या आकृत्या आहेत. नवरात्रीत तिचा उत्सव चालू होतो.

५. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी 

कोल्हापूरची श्री महालक्ष्मी

महाराष्ट्रातील मुख्य अशा साडेतीन शक्तीपिठांपैकी कोल्हापूर हे एक पूर्ण पीठ आहे. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र करवीर याचा या ठिकाणी देवीने वध केला. त्या असुराने इच्छा प्रदर्शित केल्यावरून या शहराला ‘कोल्हापूर’ आणि ‘करवीर’ ही नावे प्राप्त झाली.

भृगुकुळात जन्म झालेल्या गरुडाचल नावाच्या एका ब्राह्मणाला माधवी नावाची एक कन्या होती. ती पित्यासह वैकुंठाला गेली असता बाल स्वभावानुसार भगवान विष्णूच्या शेजारी त्याच्या पलंगावर जाऊन बसली. तेव्हा लक्ष्मीने तिला ‘अश्वमुख तुला प्राप्त होईल’, असा शाप दिला. पुढे ब्रह्मदेवाच्या वरामुळे ती शापमुक्त होऊन ‘महालक्ष्मी’ या नावाने प्रसिद्ध झाली.

कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी ४ प्रवेशद्वारे असून पश्चिम दरवाजाला ‘महाद्वार’ म्हणतात. विस्तृत आवारात महालक्ष्मीच्या प्रमुख मूर्तीसह महाकाली, महासरस्वती, कात्यायनी, शाकंभरी इत्यादी देवींच्या मूर्ती आहेत.

महालक्ष्मी चतुर्भूज असून तिच्या हातात मातुलिंग, गदा, ढाल आणि पानपत्र आहेत. डोक्यावर नागफणा आहे. मुकुटावर लिंग आणि योनी अशा आकृत्या आहेत. मूर्तीची उंची सुमारे ३ फूट असून ती काळ्या पाषाणाची आहे. वर्षातून ठराविक ३ दिवस मूर्तीवर सूर्यकिरणे येतात, त्या वेळी रत्नजडित अलंकार देवीला घातलेले असतात.

६. वणीची सप्तशृंगी, जिल्हा नाशिक

वणीची सप्तशृंगी

आदिशक्ती पीठातील हे प्रमुख पीठ नाशिकपासून ७७ किलोमीटर अंतरावर वणीजवळ आहे. देवी असलेला डोंगर अनुमाने सव्वापाच सहस्र फूट उंच आहे. वर जाण्यास दगडी पायर्‍या बांधलेल्या आहेत. या पायर्‍या अठराव्या शतकात बांधल्या गेल्या. मार्कंडेय ऋषींच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्यांना दर्शन दिले. देवीच्या आज्ञेवरून मार्कंडेयांनी या ठिकाणी स्वयंभू देवीची स्थापना केली. तिला ते नित्य पुराण सांगत असत. देवीला १८ हात आहेत. तिने हातात बाण, तलवार, वज्रपाश, शक्ती, चक्र, गदा इत्यादी आयुधे तिने धारण केलेली आहेत. मूर्तीची उंची १० फूट आहे. मूर्तीला शेंदराचा लेप दिला आहे. चैत्र नवरात्रात येथे वार्षिक यात्रा भरते.

मंदिराच्या पायर्‍या चढतांना प्रथम गरुड, शीतलातीर्थ, कूर्मतीर्थ आणि गणेश यांच्या भव्य मूर्तींचे दर्शन घडते. शिवतीर्थावर हिरवट पाणी, तर भगवती तीर्थावर तांबूस पाणी दिसते. सप्तशृंगीदेवीचा गाभारा बांधलेला नाही; कारण मूर्तीच्या वरच्या भागात तेवढी जागाच नाही. ही मूर्ती शेंदूरचर्चित रक्तवर्णी आहे. (क्रमशः)

– पां. पि. घरत

(साभार : ‘ज्ञानदूत’, दीपावली अंक १९७५)