चिपळूण, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, तशी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेणे, हे जर ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) ठरवले जात असेल, तर मग हिंदु धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणार्या जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्यावर ‘हेट स्पीच’चे गुन्हे नोंदवण्याची कारवाई का होत नाही ? असे सडेतोड उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ‘सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र’ या विषयावर येथील माधव सभागृहात श्री. शिंदे यांनी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी हिंदु यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘वागळे आणि आव्हाड यांच्या विरोधात चिपळूण येथे तक्रार प्रविष्ट करणार’, असा निर्णय एकमताने हिंदुत्वनिष्ठांनी घेतला. या कार्यक्रमाला सावर्डे, चिपळूण, गुहागर, लोटे आणि लवेल परिसरातील हिंदुत्वनिष्ठ अन् धर्मप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,
१. रशियामध्ये ज्या जोसेफ स्टॅलीन याला नरराक्षस संबोधले जाते. त्याचे नाव धारण करणार्या तमिळनाडूचे मुख्यमंत्र्यांचा पुत्र उदयनिधी स्टॅलीन याने तेथील मंदिर परिषदेतच सनातन धर्माला मलेरिया आणि डेंग्यू रोगांसारखा असल्याचे सांगून तो नष्ट करण्याचे आवाहन केले. त्या परिषदेला उपस्थित सनातन धर्माचे पालन करणारे हिंदू याला विरोध करत नाहीत, हे दुर्दैव आहे.
२. उदयनिधी स्टॅलीनची ‘री’ ओढत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, त्यामुळे ती नष्ट केली पाहिजे’, असे वक्तव्य करतात. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस मात्र चिपळूण येथे धर्मनिष्ठ पराग ओक यांनी उदयनिधी स्टॅलीन, ए. राजा, प्रियांक खरगे यांच्या विरोधात तक्रार अर्ज प्रविष्ट केला; परंतु अजूनही त्याची नोंद घेतली जात नाही. मग ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करण्याची अवमानता नाही का ? या विरोधात पुढील काळात न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली जाईल.
३. सनातन धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणारे हे कुणी जंगलात रहाणारे आणि बंदुका घेऊन निरपराध लोकांची हत्या करणारे नक्षलवादी नाहीत, तर शहरी भागांतील उच्चशिक्षित, तसेच समाजसेवा, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रांत वावरणारे आणि पुरोगामित्वाचा बुरखा घालणारे ‘अर्बन नक्षलवादी’ आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे. यावरून अर्बन नक्षलवादी कोण आहेत ? हे आपल्या लक्षात येईल.
या वेळी प्रथितयश शल्य चििकत्सक डॉ. अमित थढानी लिखित ‘दाभोलकर – पानसरे : तपासातील रहस्ये’ या पुस्तकातील काही प्रकरणांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.