मविआकडून मतदारांचा अपमान ! – आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
मुंबई – महायुती सरकार उत्तम काम करू शकते, हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून इ.व्ही.एम्.वर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पिण्याच्या पाण्याच्या तिप्पट दराने टँकरच्या पाण्याने रस्ते धुतले !
मुंबई – धूळमुक्त मुंबईसाठी येथील रस्ते पाण्याने धुण्यात आले. यासाठी २०० हून अधिक टँकर मागवले होते. या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या खर्चाच्या तुलनेत तिप्पट दराने पैसे मोजले. पिण्याच्या पाण्याच्या १० सहस्र लिटरच्या एका टँकरसाठी २ सहस्र २०० ते ३ सहस्र रुपये पडतात; पण रस्ते धुण्यासाठी तेवढ्याच क्षमतेच्या पाण्याच्या टँकरसाठी ६ सहस्र ६०० ते ७ सहस्र २०० रुपये खर्च केले.
संपादकीय भूमिका : पाण्याचा अपव्यय करणार्यांवर कारवाई व्हायला हवी !
कल्याण येथे गूढ हादरा !
कल्याण – येथील सापर्डे परिसरात २६ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजता गूढ हादरा बसला. यामुळे सापर्डे परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. नागरिकांना भूकंप झाल्यासारखे जाणवले.
स्वच्छतेसाठी कर्मचारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचे स्थानांतर होणार ! – शुभम गुप्ता
सांगली, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा आढावा आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतला. प्रत्येक प्रभागनिहाय स्वच्छतेसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून स्वच्छता कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्वच्छता हा मुख्य उद्देश असून यासाठी प्रभागनिहाय कर्मचारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचे स्थानांतर करण्यात येणार आहे. (चांगल्या स्वच्छतेसाठी स्थानांतर का करावे लागते ? – संपादक) रस्ते आणि गटारे यांची स्वच्छता करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करून कर्मचार्यांची समान प्रमाणामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व कर्मचार्यांना विविध रंगांमधील गणवेश सक्तीचा करण्यात येणार आहे.
जतच्या विकासाला प्राधान्य असेल ! – ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती
जत (जिल्हा सांगली) – जत तालुक्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन आम्ही जत येथे आलो आहे. विरोधकांनी भूमीपुत्र म्हणून हिणवले, खालच्या पातळीला जाऊन टीका केली; पण जतकरांनी ‘विकासपुत्र’ म्हणत आम्हाला जे भरभरून प्रेम दिले, ते पडळकर बंधू कधीच विसरणार नाहीत. मी जतकरांचे आभार मानतो. आम्ही आता कुणालाही शत्रू मानत नाही. जतच्या विकासाला आमचे प्राधान्य असेल, जत तालुक्याचा चेहरामोहरा पालटण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी २७ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत केले. या वेळी माजी सभापती ब्रह्मनंद पडळकर, सरदार पाटील, सुनील पवार उपस्थित होते. , असे पडळकर यांनी सांगितले.