‘ड्रग माफिया’ ललित ‘ससून रुग्‍णालया’मध्‍ये रहाण्‍यासाठी प्रतिदिन ७० सहस्र रुपये देत असल्‍याचे उघड !

पुणे – ‘ससून सर्वोपचार रुग्‍णालया’मध्‍ये वैद्यकीय उपचार घेतांना ‘अमली पदार्थांची विक्री यंत्रणा’ ललित पाटील चालवत होता. रुग्‍णालयामध्‍ये रहाण्‍यासाठी त्‍याला अतीवरिष्‍ठ व्‍यक्‍तींना प्रतिदिन ७० सहस्र रुपये द्यावे लागत होते. ही ठरलेली रक्‍कम तो रोख आणि एक आठवडा अगोदर देत होता. ही रक्‍कम रुग्‍णालयातील वरिष्‍ठांच्‍या मर्जीतील ‘चतुर्थ श्रेणी’तील कर्मचारी घेत असल्‍याची माहिती आहे.

३ वर्षांपूर्वी म्‍हणजे जून २०२० मध्‍ये अमली पदार्थांच्‍या विक्री प्रकरणी ललित पाटील याला अटक केली होती. प्रकृती अस्‍वास्‍थ्‍याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्‍ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्‍या विक्रीची यंत्रणा राबवत होता. त्‍यासाठी त्‍याला रुग्‍णालयातील २ कर्मचारी साहाय्‍य करत असल्‍याचे उघड झाले आहे.