देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

रुग्णालयातील काही डॉक्टरांचा मात्र विरोध !

नवी देहली : भारतातील क्रमांक एकचे रुग्णालय असलेली ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या’ अर्थात् ‘एम्स’च्या देहलीतील रुग्णालयात लवकरच आध्यात्मिक औषधोपचार (स्पिरिच्युअल मेडिसिन)विभाग चालू होणार आहे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून ऑक्टोबर मासाच्या शेवटापर्यंत तिला तिच्या शिफारसी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आध्यात्मिक औषधोपचारांसमवेतच प्रत्यारोपण औषधोपचार (ट्रान्सप्लांट मेडिसीन) आणि वैद्यकीय शिक्षण हे विभाग चालू करण्याचेही विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले आहे. एम्समध्ये गेल्या काही मासांपासून आध्यात्मिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आता या नव्या आध्यात्मिक औषधोपचारांच्या विभागाच्या माध्यमातून अ‍ॅलोपॅथी, योग आणि ध्यान यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रुग्णालयातील काही डॉक्टरांनी असा विभाग स्थापन करण्याचा निर्णय विज्ञानविरोधी असल्याचे सांगत त्यास विरोध केला आहे. एक वरिष्ठ प्राध्यापक म्हणाले की, एम्सचा हा निर्णय वैज्ञानिक जाणिवांच्या विरोधात असून यामुळे एका प्रथितयश आरोग्य संस्थेची प्रतिमा मलिन होईल. एम्सकडून गेल्या काही कालावधीपासून ‘विज्ञानविरोधी कृत्यां’चा पुरस्कार केला जात असून आता असा विभाग निर्माण करून ‘विज्ञानविरोधी कृत्यां’ना अधिकृत मान्यता देण्यात येत आहे.


अमेरिकेतील प्रथितयश विद्यापिठांत अध्यात्मावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश ! – एम्सच्या प्रवक्त्या

डॉ. रीमा दादा

याविषयी एम्सच्या प्रवक्त्या डॉ. रीमा दादा म्हणाल्या, ‘‘आध्यात्मिक औषधोपचारांचा विभाग चालू करण्याचा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर आहे. असा विभाग स्थापन झाल्यास त्याचा आधुनिक वैद्यकीय विभागांना साहाय्यच होणार आहे. या विभागामध्ये योग आणि रेकी यांचाही समावेश करण्यात येईल. अमेरिकेतील प्रथितयश मिशिगन विद्यापीठ आणि ‘येल स्कूल ऑफ मेडिसीन’ येथे पूर्वीपासूनच अध्यात्मावर आधारित अभ्यासक्रम शिकवले जातात.’’

संपादकीय भूमिका

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी साधना करावी लागते. शालेय शिक्षणात साधना शिकवली जात नसल्यामुळेच समाजाची दुर्दशा झाली आहे. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?