स्कॉटलंड येथे खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले !

लंडन (ब्रिटन) – स्कॉटलंड येथील गुरुद्वाराला भेट देण्याचा प्रयत्न करणारे ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानवाद्यांनी रोखले. दोराईस्वामी येथे गुरुद्वारा समितीसमवेत बैठक घेण्यासाठी आले होते. खलिस्तान्यांच्या कारवायांच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दोराईस्वामी यांनी रोखल्याच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. खलिस्तान्यांनी विरोध केल्यानंतर दोराईस्वामी हे वाहनातून तेथून निघून गेले, असे यात दिसत आहे. या घटनेविषयी स्कॉटलंड पोलिसांना कळवण्यात आले. भारत सरकारने हे प्रकरण ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर मांडले आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या आक्रमणानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.

या घटनेच्या संदर्भात एका खलिस्तान्याने सांगितले की, येथे काही जणांना ठाऊक  होते की, दोराईस्वामी बैठकीसाठी येणार आहेत. त्यामुळे ते जेव्हा गाडीतून येथे पोचले, तेव्हा त्यांना या लोकांनी परत जाण्यास सांगितले. या घटनेमुळे गुरुद्वारा समितीला वाईट वाटले असणार; मात्र ब्रिटनमधील कोणत्याही गुरुद्वारामध्ये भारतीय अधिकार्‍यांचे स्वागत केले जाणार नाही. आम्ही ब्रिटन आणि भारत यांच्या युतीमुळे त्रासलो आहोत.

संपादकीय भूमिका

ब्रिटीश सरकारने खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !