श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजेमुळे मृत्‍यू !

पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्‍या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका आल्‍याने गणेश दळवी या तरुणाचा मृत्‍यू झाला आहे. वाघोली येथील ‘उमंग होम प्राइमो सोसायटी’ गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. गेल्‍या २ दिवसांतील अशा मृत्‍यूची ही तिसरी घटना आहे.

हिंजवडी – येथील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या विसर्जन मिरवणुकीमध्‍ये डॉल्‍बीच्‍या तीव्र आवाजामुळे श्री. योगेश साखरे (वय २३ वर्षे) याचा मृत्‍यू झाला आहे. हिंजवडी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

तज्ञ आधुनिक वैद्यांनी सांगितले की, ३५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन मेंदूचा रक्‍तपुरवठा अल्‍प होतो. त्‍यामुळे चक्‍कर येण्‍यास चालू होते. ११५ डेसिबल आवाजाने बहिरेपणा आणि १३५ डेसिबलच्‍या आवाजाने कानाचा पडदा फाटू शकतो, त्‍यामुळे डीजे, बँजो आणि ढोलचा आवाज ३५ डेसिबलच्‍या आत ठेवून गणरायाला निरोप द्यावा.

संपादकीय भूमिका

  • केवळ नियम करून उपयोग नाही, तर जनतेकडून तशी कृती करून घेण्‍यासाठी प्रशासनाने कठोर रहाणे आवश्‍यक आहे, हे दर्शवणारी घटना !
  • आवाजाच्‍या मर्यादेचे उल्लंघन केलेल्‍यांवर तात्‍काळ आणि कठोर कारवाई करायला हवी. मिरवणुकीमध्‍ये पारंपरिक वाद्यांनाच अनुमती द्यायला हवी !