साधना करतांना पुणे येथील साधिका सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळालेली सूत्रे  

‘वर्ष १९९७ ते २०२३ या कालावधीत माझ्‍याकडून देवाने करवून घेतलेल्‍या साधनेमध्‍ये मला शिकायला मिळलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. नीता दिलीप साळुंखे

१. सनातन संस्‍थेशी संपर्क येणे, नामजप करण्‍यास आणि सत्‍संगाला जाण्‍यास आरंभ करणे 

वर्ष १९९४ – ९५ मध्‍ये माझा धाकटा भाऊ श्री. राहुल पाटील पुण्‍यात शिकत असतांना तो रहात असलेल्‍या खोलीत श्री. पृथ्‍वीराज हजारे रहात असत. (आताचे सनातन संस्‍थेचे २५ वे संत पू. पृथ्‍वीराज हजारे तेव्‍हा एका आस्‍थापनात नोकरीला असल्‍याने ते पुण्‍यात रहात.) तो पू. हजारेकाकांच्‍या समवेत सेवा करायचा आणि सत्‍संगाला जायचा. वर्ष १९९६ मध्‍ये पू. हजारेकाका माझ्‍या भावाला म्‍हणाले, ‘‘पुण्‍यात तुझे कुणी नातेवाईक असतील, तर त्‍यांना साधनेविषयी सांगू.’’ त्‍यानंतर ते दोघे आमच्‍या घरी आले. तेव्‍हा पू. हजारेकाकांनी आम्‍हा उभयतांपुढे ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ हे प्रवचन केले. त्‍या वेळी माझ्‍या भावाने मला जवळच्‍या सत्‍संगाचा पत्ता दिला. नंतर प्रत्‍येक आठवड्याला दूरभाष करून तो आम्‍हाला सत्‍संगाला जाण्‍याची आठवण करून देत असे. प्रवचनात सांगितल्‍याप्रमाणे आम्‍ही दत्त आणि कुलदेवी यांचा नामजप करण्‍यास आरंभ केला; परंतु मी सत्‍संगाला जायचे विसरून जात असे. एक दिवस त्‍याने सत्‍संगाच्‍या काही घंटे आधी दूरभाष केला. तेव्‍हा आम्‍ही सत्‍संगाला गेलो. आमचा मुलगा त्‍या वेळी दोन-अडीच वर्षांचा असल्‍याने (श्री. मोहनीश साळुंखे [वर्ष २०१७ मध्‍ये ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी] आताचे वय २७ वर्षे) ‘तो शांत बसणार नाही’, असे वाटून नंतर आम्‍ही सत्‍संगाला गेलोच नाही. तेव्‍हा सत्‍संग सेवक श्री. प्रशांत फणसळकर यांनी घरी येऊन आम्‍हाला सांगितले, ‘मुलगा लहान असला, तरी त्‍याला घेऊन सत्‍संगाला येत जा.’

२. सहसाधिकेच्‍या साहाय्‍याने सेवा करणे 

पुण्‍यातील सत्‍संगात श्रीमती उषा मोहे काकूही येत असत. (आताची आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के. काकू सध्‍या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करत आहेत.) मी सत्‍संगाला जायला आरंभ केल्‍यानंतर २ मासांनंतर श्रीमती मोहेकाकूंच्‍या समवेत ग्रंथप्रदर्शन लावणे, प्रवचनांचा प्रसार करणे, विज्ञापने आणणे इत्‍यादी सेवा करू लागले. मला सेवेतून आनंद मिळू लागला. अशा प्रकारे सत्‍संगानंतर मी सेवा करण्‍यास आरंभ केला.

३. सत्‍संग घेणे, तसेच प्रवचन करण्‍यास आरंभ करणे 

धुळे येथे माझ्‍या माहेरी घरातील सर्वांना सनातन संस्‍थेचे कार्य आणि साधना यांची माहिती होती. तेव्‍हा डॉ. उदय धुरी मुंबईहून धुळे येथे प्रसारासाठी येत असत. त्‍या वेळी ते माझ्‍या माहेरी थांबत असत. वर्ष १९९९ मध्‍ये मी माहेरी गेले होते. त्‍या वेळी डॉ. धुरी हे सेवेसाठी धुळ्‍याला आले होते. मला त्‍यांच्‍या समवेत प्रवचनाच्‍या प्रसाराची सेवा करता आली. सेवेनंतर ते मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही स्‍वतः सत्‍संग आणि प्रवचन घेतल्‍यास तुम्‍हाला अधिक आनंद मिळेल.’’ नंतर मी पुण्‍याला परत आल्‍यावर सत्‍संग घेणे, तसेच प्रवचन करणे या सेवांना आरंभ केला.

४. ‘गुरूंच्‍या संकल्‍पामुळेच सेवा होऊ शकते’, हे शिकायला मिळणे 

गुरूंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) संकल्‍पामुळे मी सेवेला गेल्‍यावर पुष्‍कळ लघुग्रंथ वितरण होत असत. आम्‍ही दोघी (श्रीमती मोहेकाकू आणि मी) साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायचो. ‘या सेवेतून आपले अहं-निर्मूलन होत आहे’, असे मला वाटत असे. ‘साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण गुरु करून घेत आहेत’, असा मोहेकाकूंचा भाव असल्‍याने त्‍यांच्‍या अंकांचे वितरण लवकर होत असे. आम्‍ही दोघी प्रतिदिन सकाळी ११ ते १.३० किंवा सायंकाळी ४.३० ते ७ असे नियमितपणे सेवा करत होतो. तेव्‍हा काकू प.पू. गुरुदेवांचे गुणगान करायच्‍या. त्‍या म्‍हणायच्‍या, ‘‘गुरूंच्‍या इच्‍छेविना झाडाचे पानही हलत नाही. त्‍यांच्‍या इच्‍छेविना कोणी विज्ञापन देऊ शकत नाही.’’ ‘त्‍यांचे गुरुदेवांविषयीचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटत असे. त्‍या वेळी मी काकूंना एखादा प्रसंग सांगितल्‍यास त्‍या मला आध्‍यात्मिक स्‍तरावरच त्‍याची उत्तरे देत असत.

५. यजमानांचे स्‍थलांतर मुंबईला होऊनही साधिकेने सेवेसाठी पुणे येथे रहाणे

वर्ष १९९९ मध्‍ये माझा मुलगा ४ वर्षांचा असतांना माझ्‍या यजमानांचे मुंबईला नोकरीनिमित्त स्‍थलांतर झाले. तेव्‍हा मी पुण्‍यातच राहिले. सत्‍संगात येणार्‍या जिज्ञासूंच्‍या घरी जाणे, प्रवचनाला येणार्‍या जिज्ञासूंना वैयक्‍तिक संपर्क करणे, वर्गणीदार करणे इत्‍यादी माझ्‍या नित्‍य सेवा चालू होत्‍या.

६. कुंभमेळ्‍याला सेवेसाठी गेल्‍यावर इतर जिल्‍ह्यातील साधकांनी केलेली सेवा पाहून प्रेरणा मिळणे 

मी कुंभमेळ्‍याला सेवेसाठी गेल्‍यावर तेथे इतर जिल्‍ह्यांतील साधक अविरत सेवा करत असलेले पाहून ‘आपणही झोकून देऊन सेवा करायला हवी’, याची मला जाणीव झाली. गुरुपौर्णिमा, गणेशोत्‍सव, नवरात्रोत्‍सव यांत देवाने माझ्‍याकडून विविध सेवा करवून घेतल्‍या.

७. सेवा करण्‍यासाठी दायित्‍व मिळणे आणि देवाने अनेक सेवा करवून घेणे

आमच्‍या अभ्‍यासवर्गातून नामजप, शिष्‍य आणि गुरुकृपायोग या ग्रंथांचा अभ्‍यास करवून घेतला जाई. गुरुकृपेने मला अनुमाने १० वर्षे केंद्रसेवक म्‍हणून आणि नंतर काही वर्षे जिल्‍हा विज्ञापन (जाहिरातदार) सेवक अशा दायित्‍वाच्‍या सेवा मिळाल्‍या. देवाच्‍या संकल्‍पाने एकदा गुरुपौर्णिमेला कोथरूड केंद्रास २०० विज्ञापने मिळाली होती. अजूनही विज्ञापने मिळतात. मी करत असलेल्‍या प्रवचनाला उपस्‍थित जिज्ञासूंच्‍या नोंदी आणि भ्रमणध्‍वनी क्रमांक मी एका नोंदवहीत लिहित असे. वर्ष २०१० मध्‍ये मी नोंदी बघितल्‍यावर ‘देवाने माझ्‍याकडून कोथरूड केंद्रात १०० पेक्षा अधिक प्रवचने घेण्‍याची सेवा करवून घेतली’, असे माझ्‍या लक्षात आले. साप्‍ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण करण्‍याची सेवाही मला मिळाली.

८. पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्‍याकडून भावपूर्ण सेवा करण्‍यास शिकणे 

वर्ष २००५ मध्‍ये सौ. मनीषा पाठक (आताच्‍या सनातन संस्‍थेच्‍या १२३ व्‍या समष्‍टी संत पू. (सौ.) मनीषा पाठक) कोथरूड येथेे शिक्षणाच्‍या निमित्ताने रहाण्‍यासाठी आल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍या शिक्षण घेत असतांना सेवा करत असत. त्‍यांच्‍याकडून झोकून देऊन भावासह सेवा कशी करायची ?, हे मला शिकायला मिळाले. तेव्‍हाही त्‍या सेवा करतांना सतत गुरुमाऊलींच्‍या स्‍मरणात रहात असत. वर्ष २००८ ते २०१० या कालावधीत मी पुण्‍यातील सोमेश्‍वर वाडी, सुस (कोथरूड पासून ११ किमी अंतर आहे.) येथे जाऊन सत्‍संग घेत असे. तिकडे श्रीमती शालिनी नेनेआजी (सनातन संस्‍थेच्‍या ३६ व्‍या व्‍यष्‍टी संत पू. (कै.) शालिनी नेने आजी) यांची भेट झाल्‍यावर पुष्‍कळ आनंद मिळत असे.

९. ‘विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक यांची साधना व्‍हायला हवी’, हा केंद्रबिंदू लक्षात ठेवून सेवा करणे 

बेळगाव येथील श्री. यशवंत कणगलेकर पुणे जिल्‍ह्यात पंचांगासाठी विज्ञापने मिळवणे आणि ग्रंथालयात ग्रंथसंच ठेवणे यांसाठी प्रायोजक मिळवण्‍याच्‍या सेवांसाठी येत असत. विज्ञापनदात्‍यांची साधना व्‍हावी, त्‍यांनीही स्‍वभावदोष-निर्मूलन करून साधना करावी, यासाठी काका कागद पेन घेऊन त्‍यांना अभ्‍यासपूर्ण समजावून सांगत असत. त्‍यामुळे ‘अर्पण देण्‍याच्‍या माध्‍यमातून विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक यांची साधना व्‍हायला हवी’, हा केंद्रबिंदू लक्षात येऊन त्‍या दृष्‍टीने माझेही प्रयत्न होऊ लागले. आरंभी श्री. शंभू गवारे (आताची आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांनी आम्‍हाला विज्ञापनाच्‍या सेवेसाठी आवश्‍यक अशा धारिका सिद्ध करून दिल्‍या, उदा. विज्ञापनाचा आकार, त्‍याचे मूल्‍य, प्रकार. त्‍यात आम्‍ही दैनिकातील महत्त्वपूर्ण बातम्‍यांची कात्रणे लावत असू. त्‍यामुळे ‘विज्ञापनदात्‍यांना सनातनचे कार्य किती चांगले आहे ?’, याचा अंदाज येत असे आणि ते वर्गणीदारही होत असत. वर्षभरात १२ विज्ञापनाचे संच (पॅकेज) देणारे ६ विज्ञापनदाते सिद्ध झाले. वैशिष्‍ट्यपूर्ण म्‍हणजे कोथरूड आणि कर्वेनगर या भागातील १२ नगरसेवकही नियमित विज्ञापने देऊ लागले आणि काही जण पंचांगही विकत घेत असत.

१०. मुलाकडून सेवा करवून घेणे 

माझा मुलगा मोहनीश यालाही आध्‍यात्मिक अनुभूती येत असत. त्‍या ऐकून माझी श्रद्धा वाढत असे. तो ८ वी ते ११ वी मध्‍ये शिकत असतांना उन्‍हाळ्‍याच्‍या सुट्टीत आश्रमात जाऊन १ ते २ मास रहात असे. त्‍याला आश्रम आणि साधक यांमध्‍ये रहाण्‍याने पुष्‍कळ आनंद मिळत असे. मुलाला सत्‍संग मिळावा; म्‍हणून तो शाळेतून आला की, मी त्‍याला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील साधकांचे लेख वाचून दाखवत असे. त्‍यातून आम्‍हा दोघांना पुष्‍कळ आनंद मिळत असे. तो महाविद्यालयात जातांना प्रतिदिन १८ दैनिकांचे वितरण करत असे. तो धर्मजागृती सभांचा प्रसार करत असे. नंतर  त्‍याचा आध्‍यात्‍मिक त्रास पुष्‍कळ वाढला. तशा स्‍थितीत मी सेवा करतच होते. सेवा करतांना ‘आपले कित्‍येक जन्‍मांचे प्रारब्‍ध नष्‍ट होत आहे’, असा भाव माझ्‍या मनात असतो.

११. चारचाकी गाडीचा प्रसारासाठी उपयोग करणे आणि कोरोना महामारीच्‍या कालावधीत घरी राहून विविध ऑनलाईन सेवा करणे 

२०१६ या वर्षी मला देवाने चारचाकी गाडी शिकण्‍याची प्रेरणा दिली. त्‍यामुळे साधकांना धर्मजागृती सभांना घेऊन प्रसारासाठी जाता येऊ लागले. पुढे २०१८-२०१९ या वर्षीच्‍या गुरुपौर्णिमेसाठी विज्ञापने मिळवणे किंवा धर्मसभेचा प्रसार करणे यांसाठी ६० कि.मी. दूर भोर, शिरवळ या गावांत मी चारचाकी गाडी घेऊन जात असे. नंतर कोरोना महामारीच्‍या काळात ‘ऑनलाईन’ सत्‍संगाच्‍या ‘लिंक’ पाठवणे, नामजप पाठवणे आदी सेवा देवाने माझ्‍याकडून करून घेतल्‍या. त्‍या काळात पुण्‍यातील एका प्रतिष्‍ठित व्‍यक्‍तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्‍या वेळी मी त्‍यांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी नामजप पाठवला.

‘हे परम दयाळू गुरुमाऊली, या जन्‍मात माझा उद्धार व्‍हावा; म्‍हणून तुम्‍ही मला ‘व्‍यष्‍टी साधना कशी करायची ?’, ते शिकवले. तसेच वेगवेगळ्‍या समष्‍टी सेवा आणि निरपेक्ष प्रीती करणारे सहसाधक उपलब्‍ध करून दिलेत आणि सतत सत्‌मध्‍ये ठेवले. यासाठी मी आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

 – सौ. निता दिलीप साळुंखे (वय ५३ वर्षे), कोथरूड, पुणे (२८.२.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक