कॅनडामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचाराचे समर्थन केले जात आहे !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सुनावले !

डॉ. एस्. जयशंकर आणि जस्टिन ट्रूडो

न्यूयॉर्क (अमेरिका) – कॅनडामध्ये आमच्या मुत्सद्दींना घाबरवले जाते आणि धमकावले जाते. आमच्या वाणिज्य दूतावासांवर आक्रमणे केली जातात. ‘लोकशाहीत असेच घडते’, असे सांगून ‘हे सर्व समर्थनीय आहे’, असे म्हटले जाते, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी कॅनडाला फटकारले. ‘कॅनडामध्ये फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि अतिरेकी यांच्याशी संबंधित गुन्हे फोफावत आहेत. जर त्रासदायक अशी कोणतीही घटना घडली आणि मला सरकार म्हणून काही माहिती दिली, तर मी निश्‍चितपणे त्याकडे लक्ष देईन’, असेही जयशंकर यांनी या वेळी स्पष्ट केले. ते ‘कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स’ या चर्चेमध्ये बोलत होते.

डॉ. एस्. जयशंकर यांनी मांडलेली सूत्रे

१. भारताने कॅनडाला तेथील गुन्हेगारी कृत्ये आणि आतंकवादी यांच्याविषयी बरीच माहिती दिली आहे आणि अनेक लोकांच्या प्रत्यार्पणाची विनंतीही केली आहे. आम्ही त्यांना कॅनडातून चालणार्‍या संघटित गुन्हेगारी आणि त्याचे नेते यांच्याविषयी बरीच माहिती दिली आहे. अनेक आतंकवादी नेते आहेत ज्यांची ओळख पटली आहे.

२. निज्जर याच्या हत्येवरील आरोपांविषयी जयशंकर म्हणाले की, आम्ही कॅनडाला सांगितले आहे, ‘हे भारत सरकारचे धोरण नाही.’ तरीही त्यांच्याकडे काही विशिष्ट पुरावा असेल, तर त्यांनी आम्हाला सांगावे. संपूर्ण माहितीखेरीज कोणतेही पाऊल उचलता येत नाही. वास्तविक निज्जर याच्या हत्येच्या आरोपांविषयी कॅनडाने अद्याप कोणताही पुरावा दाखवलेला नाही.

राजकारणासाठी आतंकवादाला प्रोत्साहन देणे अयोग्य !

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी २६ सप्टेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतांना कॅनडाचे नाव न घेता म्हटले होते की, राजकारणासाठी आतंकवादाला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. आमचा विश्‍वास आहे की, सार्वभौमत्वाचा आदर महत्त्वाचा आहे; परंतु हा आदर निवडक नसावा. आतंकवाद आणि हिंसाचार यांवर राजकीय सोयीनुसार कारवाई करू नये. प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि सोयीनुसार अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करता येत नाही.

(म्हणे) ‘कुणाच्याही राजकीय लाभासाठी आम्ही झुकणार नाही !’ – कॅनडा

स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे. अशा कॅनडाने अशा प्रकारची विधाने करणे हास्यास्पदच होत !

संयुक्त राष्ट्रांमधील कॅनडाचे राजदूत बॉब रे महासभेत म्हणाले की, ज्या वेळी आपण समानतेचे महत्त्व सांगतो, त्या वेळी आपल्याला न्याय्य आणि लोकशाही समाजाची मूल्ये जपली पाहिजेत. कुणाच्याही राजकीय लाभासाठी आम्ही झुकणार नाही. परकीय हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. सत्य हे आहे की, आपण मान्य केलेले नियम आपण पाळले नाहीत, तर आपल्या समाजाच्या मूलभूत रचनेवर परिणाम होईल.