शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून ट्रुडो यांच्या भारतावरील आरोपांचे समर्थन

प्रस्तावही संमत

अमृतसर (पंजाब) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारतावर आरोप केले आहेत. या आरोपांचे पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने (एस्.जी.पी.सी.ने) समर्थन केले आहे. एस्.जी.पी.सी.ने या संदर्भात एक प्रस्ताव संमत केला आहे.

१. एस्.जी.पी.सी.ने ट्वीट करून म्हटले आहे की, आज (२५ सप्टेंबर २०२३) या दिवशी कार्यकारिणीच्या बैठकीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केलेल्या आरोपांवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. तेथील निवासी शीख हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणात भारतीय यंत्रणांच्या अधिकार्‍यांचा सहभाग आहे.  (शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडे या संदर्भात काही पुरावा आहे का ? जर नसेल, तर तिने यासाठी क्षमा मागितली पाहिजे आणि जर क्षमा मागणार नसेल, तर सरकार या कमेटीवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

२. एस्.जी.पी.सी.च्या कार्यकारिणीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, कॅनडाच्या पंतप्रधानांचे विधान संसदेत केल्याने ते सामान्य नाही. ट्रुडो यांनी भारतीय यंत्रणांवर केलेल्या आरोपाची सत्यता राजकारणाच्या पलीकडे जाऊन पडताळून प्रमाणिकपणे जनतेसमोर आणली पाहिजे. जर राजकारणापोटी हे प्रकरण दडपले, तर हा मानवाधिकारांवरील अन्याय मानला जाईल. या संपूर्ण घटनेनंतर प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून जाणीवपूर्वक शीख अन् पंजाब यांच्याविरोधात द्वेष पसरवला जात आहे. भारत सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पहात शिखांची प्रतिमा खराब करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी. शीख समाज सर्व धर्मांचा सन्मान करतो. सध्या समाजांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संपादकीय भूमिका 

भारतावर बिनबुडाचे आरोप करणार्‍यांचे समर्थन करणार्‍या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून भारत सरकारने स्पष्टीकरण मागितले पाहिजे ! खलिस्तानी आतंकवाद्याच्या बाजूने बोलणार्‍या या कमेटीची चौकशीही करून त्यात खलिस्तानी विचारसरणीची लोक आढळली, तर त्यांच्यावर कठोर कारवाईही केली पाहिजे !