‘१५.९.२०२३ या दिवशी भांडूप येथील कै. मदन मोहन चेऊलकर यांचे निधन झाले. २६.९.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस होता. त्यांच्याविषयी त्यांचा मुलगा आणि सून यांना त्यांच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. काव्या कुणाल चेऊलकर (कै. मदन मोहन चेऊलकर यांची सून), भांडुप, मुंबई.
१ अ. कर्करोग झाल्याचे निदान होणे : ‘जून २०२३ मध्ये सतत येणार्या तापावर इलाज करण्यासाठी बाबांना (श्री. मदन मोहन चेऊलकर यांना) रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांच्या आजाराची इतर लक्षणे पाहून वैद्यांनी त्यांना रुग्णालयात भरती करून घेतले. अनेक तपासण्या आणि चाचण्या केल्यानंतर त्यांना फुप्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.
१ आ. श्रद्धेने नामजप करणे आणि तो वहीत लिहून वैखरीतही (मोठ्याने) म्हणणे : प्रारंभी चाचण्या आणि तपासणी होईपर्यंत २ आठवडे ते रुग्णालयात भरती होते. या कालावधीत त्यांच्या ‘आजाराचे निदान व्हावे आणि त्यांना बरे वाटावे’, यासाठी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजप दिला होता. बाबा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत नसूनही ते दिलेला नामजप श्रद्धेनेे पूर्ण करत असत. त्यांना माझे यजमान (श्री. कुणाल) यांनी एक वही बनवून दिली होती. त्यात ते दिलेला नामजप लिहीत असत. त्यांना नामजप करायला सांगितल्यावर ते वैखरीतून (मोठ्याने) नामजप म्हणत असत. याच कालावधीत २० दिवस आमच्या भांडूप येथील घराच्या दुरुस्तीचे काम चालू झाल्यामुळे बाबा देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात निवासाला होते.
१ इ. देवद, पनवेल येथील आश्रमात आल्यानंतर बाबांमध्ये जाणवलेले पालट
१. बाबा घरी सतत चिडचिड करायचे; परंतु ते आश्रमात आल्यावर शांत झाले.
२. बाबांना घरी असतांना नियमितपणे मांसाहार करण्याची सवय होती. आश्रमातील सात्त्विक अन्न त्यांनी कोणतीही तक्रार न करता ग्रहण केले.
३. ते त्यांना जमेल त्याप्रमाणे आध्यात्मिक उपायांच्या खोलीत जाऊन नामजपासाठी बसत.
४. एकदा ते भोजनकक्षात महाप्रसादासाठी आले असता सद़्गुरु राजेंद्र शिंदे मला भेटले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘बाबांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिकाधिक करायला सांगा.’’ तो मी बाबांना जाऊन सांगितल्यावर त्यांनी तिथेच मोठ्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर घरी गेल्यावर जमेल तेव्हा ते दत्ताचा नामजप वहीत लिहीत असत.
५. बाबांना अनेक वर्षांपासून दम्याचा (अस्थमाचा) त्रास होता. त्यात त्यांना फुप्फुसाचा कर्करोग झाला होता. त्यामुळे त्यांना सतत दम लागायचा. जिने चढ करणे त्यांना कठीण जात असे, तरीही प्रसाद-महाप्रसाद घेण्यासाठी निवासस्थानाहून (आश्रमाच्या शेजारी असलेल्या संकुलातून) ते आश्रमात येत असत. बाबा केवळ आणि केवळ श्री विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या वैकुंठरूपी आश्रमात आल्यामुळे त्यांच्यामध्ये एवढा बुद्धीअगम्य पालट झाला.
१ ई. रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि अन्य कर्मचारी वर्गाने साहाय्य करणे : शेवटच्या १५ दिवसांत बाबांना सिद्धिविनायक नावाच्या रुग्णालयामध्ये भरती केले होते. या रुग्णालयातील वातावरण अन्य रुग्णालयाच्या तुलनेत सात्त्विक होते. रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि अन्य कर्मचारी वर्ग नम्र अन् साहाय्य करणारा होता. याच रुग्णालयामध्ये आल्यावर बाबांची प्रकृती बिघडत गेली. त्यांना घरी आणल्यानंतर १ दिवसाने त्यांचे निधन झाले.
‘प्रत्यक्ष विघ्नहर्त्या सिद्धिविनायकाने त्यांच्या पुढील प्रवासातील सर्व विघ्ने दूर केली आणि त्यांचा मार्ग मोकळा करून दिला’, असे मला वाटले. गेल्या साडे तीन मासांमध्येे बाबांच्या आजारपणात भगवंताने अनेक अनुभूती दिल्या. गुरुमाऊली क्षणाक्षणाला आमच्या समवेत होती. सर्व भार गुरुमाऊलीच वहात होती. त्याबद्दल श्री विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्री. कुणाल मदन चेऊलकर (कै. मदन मोहन चेऊलकर यांचा मुलगा), भांडुप, मुंबई.
२ अ. एका चाचणीत ‘रिडींग’ योग्य येण्यासाठी २४ घंटे दम्याचे औषध घ्यायचे नसणे, तेव्हा अशक्य वाटणारी ही चाचणी बाबांनी स्वीकारणे : ‘बाबांना लहानपणापासून दम्याचा आजार होता. त्यावर ते दम्याचे औषध घेत असत. फुप्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर त्यांचे दम लागण्याचेे प्रमाण अधिक वाढले होते. त्यांच्या फुप्फुसांची क्षमता मोजण्यासाठी ‘पी.एफ्.टी’ (पल्मोनरी फंक्शन टेस्ट) नावाची चाचणी करायला सांगितली होती. या चाचणीचे ‘रिडींग’ योग्य येण्यासाठी २४ घंटे दम्याचे औषध घ्यायचे नव्हते. हे कळल्यावर माझ्या मनात ‘ही चाचणी होणे अशक्य आहे’, असा विचार आला. औषधाविना बाबांची ‘पाण्याविना मासा’, तशी स्थिती होते; परंतु बाबांनी औषध न घेण्याचे स्वीकारले.
२ आ. बाबांनी २० घंटे दम्याचे औषध न मागणे, चाचणीसाठी जातांना दम लागण्यास प्रारंभ होणे आणि त्यांनी ‘चाचणी करायची नाही’, असे सांगून औषध मागणे : ‘बाबांना औषध मिळू नये’, यासाठी मी औषध माझ्याजवळ लपवून ठेवले. २४ घंट्यांपैकी २० घंटे व्यवस्थित गेले. त्यांनी औषध मागितले नाही; पण या चाचणीसाठी घरातून निघतांना त्यांना दम लागण्यास प्रारंभ झाला. काही वेळातच त्यांचा जीव कासावीस व्हायला लागला आणि ते औषध मागू लागले. तेव्हा ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. ‘मला चाचणी करायची नाही. मी रुग्णालयात जाणार नाही. तू मला औषध दे’, असे ते म्हणू लागले.
२ इ. रुग्णालयात जाण्याच्या वेळी बाबांनी दम्याचे औषध मागून चिडचिड करणे आणि पत्नीने सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजप विचारून घेणे : ‘इतके परिश्रम घेतले आणि आता नेमके रुग्णालयात जाण्याच्या वेळेला ते औषध मागत आहेत’, या प्रसंगाचा मला ताण आला. हा प्रसंग मी माझी पत्नी सौ. काव्या हिला सांगितल्यावर तिने लगेच सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना भ्रमणभाष करून त्यांची स्थिती सांगितली आणि सद़्गुरु राजेंद्रदादांनी त्यासाठी नामजप दिला.
२ ई. ‘नामजपाने अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात’, हे लक्षात येणे : नामजप मिळाल्यावर आम्ही तिघांनी (मी, काव्या आणि माझी आई (सौ. माधुरी चेऊलकर) नामजपाला प्रारंभ केला. पाच ते दहा मिनिटांत बाबा शांत झाले आणि आम्ही तपासणीसाठी रुग्णालयात जाऊ शकलो. या प्रसंगातून ‘नामजपाने अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात’, हे माझ्या लक्षात आले.’
(सर्व सूत्रांचा २१.९.२०२३)
मित्राच्या उदाहरणातून साधनेचे महत्त्व लक्षात येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे‘बाबांच्या (कै. मदन मोहन चेऊलकर) उपचारासाठी मुलुंड येथील रुग्णालयामध्ये असतांना माझ्या आधीच्या आस्थापनातील एक सहकारी मित्र भेटले. ते हिंदुत्वाच्या विचारांचे असल्याने माझ्या संपर्कात होते. त्यांना बाबांच्या आजारपणाबद्दल सांगितले. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, ‘‘तू किती रुपयांचे कर्ज काढले आहेस?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘आईच्या (सौ. माधुरी चेऊलकर) कामगार विमा योजनेचे ‘कार्ड’ असल्याने मला पैसे भरावे लागत नाहीत. त्यामुळे मला कर्ज काढावे लागले नाही. तेव्हा ते मित्र म्हणाले, ‘‘भाग्यवान आहेस. माझ्या आईला छातीचा कर्करोग झाला होता. तिच्या उपचारासाठी मला १६ लाख रुपयांचे कर्ज काढावे लागले होते. एवढे पैसे व्यय करूनही माझी आई वाचू शकली नाही. मी अत्यंत कठीण परिस्थितीतून गेलो आहे. ‘उपचारांसाठी मला सर्वांकडून कर्ज घ्यावे लागले’, याचा मला ताण आहे. तू धर्माचे कार्य करतोस. त्याचे तुला फळ मिळाले.’’ त्याची ही परिस्थिती ऐकल्यावर मला गुरुदेवांबद्दल (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल) आणखी कृतज्ञता वाटली. आजही मला तो प्रसंग आठवला, तर कृतज्ञता वाटते. गुरुदेवांनी हे घोर आणि तीव्र प्रारब्ध भोगायचे बळ मला दिले. आमच्यासाठी आर्थिक सोयही आधीच करून ठेवली होती. मध्यंतरी ‘पूर्णवेळ साधना करत असतांना आर्थिक अडचणीमुळे नोकरी करायची’, असे विचार माझ्या मनात असायचे. तसे झाले असते किंवा ‘नोकरी करून साधना केली असती, तर कमावलेले सर्व पैसे व्यय होऊन माझ्यावर कर्जही झाले असते; परंतु गुरुदेवांनी असे काही होऊ दिले नाही आणि माझ्याकडून साधनासुद्धा करून घेतली’, याबद्दल श्री गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता !’ – श्री. कुणाल मदन चेऊलकर, भांडुप, मुंबई. (२१.९.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |