सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी परिसरातील शाळा दत्तक घेणार ! – विष्णु मोंडकर, अध्यक्ष, गाबीत फिशरमेन फेडरेशन

मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवरील मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या तालुक्यांत मासेमारांची वस्ती आहे. येथे मासेमार समाजाची मुले शिक्षण घेत असलेल्या शाळा ‘गाबीत फिशरमेन फेडरेशन’ दत्तक घेण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करणार आहे, अशी माहिती ‘गाबीत फिशरमेन फेडरेशन’चे अध्यक्ष विष्णु मोंडकर यांनी दिली.

‘गाबीत फिशरमेन फेडरेशन’चे अध्यक्ष विष्णु मोंडकर

राज्यातील शासकीय शाळा दत्तक देण्याच्या निर्णयास राज्यशासनाने मान्यता दिली असून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या माध्यमातून दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, ‘कॉर्पोरेट ग्रुप’ यांच्या माध्यमातून शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर मत्स्यव्यावसायाचे शिक्षण आणि इतर शालेय शिक्षण देण्यासाठी मत्स्यव्यवसाय शाळा अस्तित्वात होत्या. त्या शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे चालवल्या जात होत्या. त्या माध्यमातून मासेमार समाजातील मुलांना शालेय शिक्षणासह मत्स्यव्यावसायाचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे बाल जीवनातील शिक्षण पद्धतीचा उपयोग होऊन विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनात, तसेच व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करतांना त्याचा लाभ झाला; परंतु शासनाच्या धोरणानुसार किनारपट्टीच्या शाळा जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आल्या आणि या शाळांतून मासेमार समाजाला मिळणारे व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे बंद झाले. याचा दूरगामी परिणाम मासेमार समाजाच्या युवा पिढीवर झाला. या सर्वांचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या तालुक्यांतील मासेमार  समाजाची मुले शिक्षण घेत असलेल्या शाळा ‘गाबीत फिशरमेन फेडरेशन’ दत्तक घेण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षणासह मासेमारी क्षेत्रातील शिक्षण, नोकरी आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारी शिक्षणपद्धत कार्यरत करणे आवश्यक आहे.

( सौजन्य : SACHIN ARUN JOSHI)

सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि.मी.ची किनारपट्टी असून येथील २५ सहस्र कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह मासेमारी क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, क्रीडा, आरोग्य, कौशल्य विकास, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षणपद्धतीत राबवण्याचा प्रयत्न असल्याचे विष्णु मोंडकर यांनी सांगितले.