मागील साडेचार वर्षांत गोव्यातील साडेसहा सहस्र युवक मद्य किंवा अमली पदार्थ व्यसनांच्या आहारी !

गोव्यातील तरुण नशेच्या विळख्यात !

गोव्यातील तरुणाई मद्य आणि अमली पदार्थांच्या आहारी !

पणजी – मागील साडेचार वर्षांत ६ सहस्र ५९२ गोमंतकीय युवक मद्यप्राशन किंवा अमली पदार्थाचे सेवन या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. बेरोजगारी, व्यवसायात हानी होणे, संबंध दुरावणे, कोरोना महामारी आदी अनेक समस्यांमुळे युवावर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे.

वर्ष २०१८ पासून आतापर्यंत ६ सहस्र ५९२ युवक मद्य किंवा अमली पदार्थ यांच्या पूर्णपणे आहारी गेल्याने त्यांना सरकारी पुनर्वसन केंद्रांमध्ये (दोन जिल्हा रुग्णालये आणि ‘आय.पी.एच्.बी.’ रुग्णालय येथे) भरती करावे लागले आहे. एका वृत्तपत्राने माहिती अधिकाराखाली मिळवलेली ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंत अमली पदार्थ सेवनाचे व्यसन जडलेल्या १२४ व्यक्तींनी उपाचार घेऊन व्यसन सोडले आहे. आधुनिक वैद्यांच्या मते, गोव्यात अमली पदार्थांचे सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. युवकांना अमली पदार्थ सहजतेने उपलब्ध होणे, हीसुद्धा एक गंभीर गोष्ट आहे. पूर्वी समुद्रकिनारपट्टीपुरती मर्यादित असलेली ही समस्या आता गोव्याच्या गावागावांत पोचली आहे.

संपादकीय भूमिका

  • सनबर्नसारख्या कार्यक्रमांत अमली पदार्थ, मद्य यांचा सर्रास होत असलेला वापर या स्थितीला उत्तरदायी आहे !
  • युवकांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी सर्वांना साधना शिकवणे आवश्यक आहे !