हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा देगाव ग्रामपंचायतीचा निर्णय !

हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन करण्यापूर्वी श्री गणेशमूर्तीदान स्वीकारण्याविषयी देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला फलक
हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला फलक

सातारा, २३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्री गणेशमूर्ती दान करण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर देगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय मागे घेत श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन व्हावे, या हेतूने देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सार्वजनिक तलावात न करता घरातील हौदामध्ये किंवा पाण्याच्या पिंपामध्ये करावे, तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन संगम माहुली आणि जैतापूर येथून वहाणार्‍या कृष्णा नदीमध्ये करावे आणि ज्यांना वरील दोन्ही प्रकारे विसर्जन करणे शक्य नसेल, त्यांनी श्री गणेशमूर्ती ग्रामपंचायतीकडे दान द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आणि धर्मप्रेमी विनायक बाबर यांनी देगाव ग्रामपंचायत प्रशासन, तसेच सरपंच आणि उपसरपंच यांचे प्रबोधन केले. श्री गणेशमूर्ती दान घेणे, हे अशास्त्रीय कसे आहे ? हे समजावून सांगितले. याला सकारात्मक प्रतिसाद देत देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी श्री गणेशमूर्ती दान न घेण्याचा निर्णय घेतला, तसेच ज्या ग्रामस्थांना श्री गणेशमूर्ती नदीपर्यंत नेणे शक्य नाही, त्यांनी श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी देगाव ग्रामपंचायतीचे साहाय्य घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जागरूक धर्मप्रेमींमुळे प्रबोधन !

देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अशास्त्रीय आवाहन करण्यात आल्यानंतर काही जागरूक धर्मप्रेमी नागरिकांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधला. या वेळी या धर्मप्रेमींनी देगाव ग्रामपंचायतीने लावलेल्या अशास्त्रीय आवाहनाच्या फलकांची छायाचित्रे समितीकडे पाठवली. समितीने प्रबोधन केल्यानंतर या फलकावरील मूर्तीदान घेण्याविषयीचा मजकुर दिसू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून त्यावर पट्टी लावण्यात आली.