पूर्वीच्या ठाणे येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे रहाणार्या सौ. लक्ष्मी कोंडिबा जाधव यांची शारीरिक आजारामुळे अनेक शस्त्रकर्मे झाली आहेत. याही स्थितीत त्या साधना करत आहेत. त्यांची मुलगी सौ. मनीषा पानसरे आणि जावई श्री. अरविंद पानसरे यांना जाणवलेली त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. मनीषा अरविंद पानसरे (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), फोंडा, गोवा.
१ अ. स्वभाव भित्रा असूनही कर्करोगाचे निदान झाल्यावर खचून न जाता तटस्थ रहाणे : ‘आईचे कर्करोगाचे पहिले शस्त्रकर्म झाले, त्या वेळी मी दहावीमध्ये होते. आईचे आजारपण, घराचे दायित्व आणि अभ्यास हे देवाच्या कृपेने आपोआप होत होते. आई एरव्ही भित्र्या स्वभावाची आहे; पण तिला कर्करोगाचे निदान झाल्यावर ती अजिबात खचून गेली नाही. तिच्यामध्ये एक वेगळेच बळ आले आणि इच्छाशक्ती प्रबळ झाली. ती आजपर्यंत टिकून आहे.
१ आ. काटकसरी : आईच्या लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. शाळेत जातांना प्रतिदिन खाऊ खाण्यासाठी तिला जे पैसे मिळायचे, त्यातील शिल्लक पैसे साठवून तिने त्या पैशांतून तिच्या लग्नाच्या वेळी सोन्याच्या ४०० रुपयांमध्ये २ बांगड्या केल्या.
१ इ. दागिन्यांची आसक्ती नसणे : कालांतराने त्यावरील नक्षीकाम बदलून त्याच बांगड्या ती अजूनही वापरत आहे. लग्नानंतर काही वर्षांनी आई-बाबांची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावरसुद्धा तिने कधीच बाबांना ‘आणखी बांगड्या, पाटल्या किंवा इतर दागिने करूया’, असे कधीच सांगितले नाही. पूर्वी तिला मायेतील गोष्टींविषयी आकर्षण होते. आता ते न्यून झाले आहे.
१ ई. स्वभाव पुष्कळ बोलका असल्यामुळे समाजात पुष्कळ माणसे आणि साधकही जोडून ठेवणे : तिचा स्वभाव पुष्कळ बोलका आहे. काही वेळा मला वाटायचे की, ‘ही किती बोलते’; पण कालांतराने लक्षात आले की, ‘तिच्या बोलक्या स्वभावामुळे तिने पुष्कळ माणसे जोडली आहेत. साधनेत आल्यावर साधकांना जोडून ठेवले आहे.’ काही वर्षांपूर्वी बाबा आणि मी गोव्याला सेवेला असतांना शेजारी रहाणारी मंडळी तिला काय हवे-नको ते पहात आणि सर्व साहाय्य करत असत. आईसुद्धा त्यांच्या अडचणीत पुढाकार घेऊन त्यांना साहाय्य करत असे.
१ उ. स्थलांतर करतांना मनाचा पुष्कळ संघर्ष होणे : ठाण्याहून गोव्याला स्थलांतर होण्यासाठी आईला मनाची सिद्धता करायला २ – ३ वर्षे गेली. तेव्हा तिचा पुष्कळ संघर्ष झाला; पण कालांतराने गोव्याला आल्यावर तिने सर्व परिस्थितीशी जुळवून घेतले आणि आता ती आनंदी आहे.
१ ए. प्रेमभाव
१ ए १. जुन्या रहात्या घरी ६ वर्षांनंतर गेल्यानंतरही शेजारी रहाणारे भेटायला येणे : ६ वर्षांपूर्वी आई-बाबा गोव्याला स्थलांतरित झाले. ठाण्याला रहाणारे शेजारी मंडळी अजूनही भ्रमणभाषवरून तिच्या संपर्कात आहेत. अगदी ठाण्याला आमच्याकडे काम करणारी कामवाली बाईसुद्धा अधून-मधून भ्रमणभाष करते. काही दिवसांपूर्वी मी आणि आई ६ वर्षांनी ठाण्याला गेल्यावर सगळे आवर्जून भेटायला आले. तेव्हा लक्षात आले की, ‘आईने प्रेमाने कशी माणसे जोडून ठेवली होती !’
१ ए २. तिचे २ वर्षांपूर्वी गुडघ्याचे शस्त्रकर्म झाले. तेव्हाही तिचा व्यायाम करून घेणार्या २ मुलींशी तिने इतकी जवळीक साधली की, आताही कधी आम्ही तपासणीसाठी गेलो, तरी त्या आवर्जून भेटायला येतात.
१ ऐ. साधना नियमित करणे : शारीरिक त्रासांसाठी मध्यंतरी तिला ३ – ४ प्रकारचे नामजप मोठ्या आकारात मी एका पुठ्यावर चिकटवून दिले. तो पुठ्ठा ती बसते, त्या जागेवर ठेवून ती सतत मध्ये मध्ये नामजप करत रहाते.
ती सांगितलेले नामजप आणि उपाय नियमित करते. प्रतिदिन सकाळी १० वाजताचे दत्तमाला मंत्रपठण करण्यासाठी कितीही थकवा असला, तरी वेळेत आवरून तयार रहाते.
१ ओ. अनेक शारीरिक त्रासांत आणि शस्त्रकर्माच्या वेळी पूर्वपुण्याईमुळे वेळेत अन् योग्य उपचार मिळणे : आतापर्यंत आईच्या शारीरिक आजारपणासाठी तिची अनेक शस्त्रकर्मे झाली. अनेक आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) भेटणे, रुग्णालयात भरती होणे, उपचार घेणे असे झाले; पण प्रत्येक ठिकाणी तिला पटपट उपचार मिळाले. आधुनिक वैद्य चांगले मिळून तिच्या आजारावर लवकर उपचार होत गेले. ‘कुठेही अडचण आली आणि थांबून रहावे लागले’, असे कधी झाले नाही. ‘हे सर्व तिच्या पूर्वपुण्याईमुळे मिळाले’, असे जाणवते.
आतापर्यंत आई-बाबांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; पण दोघांनी सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाऊन साधनेच्या बळावर ते त्यातून बाहेर आले.’
२. श्री. अरविंद पानसरे (जावई) वय ४५ वर्षे, फोंडा, गोवा.
२ अ. मुलांकडून अपेक्षा नसणे : ‘सासूबाईंना एक मुलगा (श्री. मंगेश जाधव) आणि मुलगी (सौ. मनीषा पानसरे) आहेत; मात्र त्यांना मुलांकडून व्यवहारातील वा कौटुंबिक स्वरूपाच्या अपेक्षा नाहीत. मुलगा ‘आर्किटेक्ट’ असून तो पनवेल येथे असतो. व्यवसायाच्या निमित्ताने देशभर फिरतीवर असतो. तो २ – ३ मासांतून भेटण्यासाठी येतो; पण तरी ‘मुलाने पुष्कळ दिवस घरी रहावे’, अशी त्यांची अपेक्षा नसते, तसेच त्या मुलामध्ये अडकलेल्या नाहीत. सर्वकाही ईश्वरावर सोपवून त्यांची साधना चालू आहे. असे असले, तरी कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या सतर्क असतात.
२ आ. सर्व प्राणीमात्रांप्रती प्रेमभाव असणे
१. ‘सासूबाई प्रेमळ असून ‘बाहेरून घरी येणार्या व्यक्तीला काही तरी खायला द्यायला हवे’, असा त्यांचा विचार असतो. केवळ व्यक्तीच नव्हे, तर त्यांना प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दलही प्रेम आहे. इमारतीच्या खाली त्यांना एक कुत्रा दिसला. त्याचा पाय दुखावला होता. त्या वेळी त्या प्रतिदिन त्याला खिडकीतून खाली बिस्कीट, टोस्ट आणि अन्य खाद्यपदार्थ न चुकता टाकत होत्या. तो कुत्राही सकाळी खिडकीखाली थांबून खाऊची वाट पहायचा.
२. घरी काही विशेष पदार्थ केला असेल किंवा बाहेरून काही खाऊ आणला असेल, तर त्या मी घरी पोचल्यावर आठवणीने मला खाऊ देण्यासाठी त्या सौ. मनीषा पानसरे यांना सांगतात. त्यांच्यातील ‘प्रेमभावामुळे त्या हे सहजपणे करतात’, असे वाटले.
३. त्या घरी काही चांगला पदार्थ केला की, तो आश्रमातील वयस्कर साधकांसाठी आवर्जून पाठवतात.
२ इ. वेळेचा वापर साधनेसाठी करणे : त्या शारीरिक स्थितीमुळे घरीच असतात. अशा वेळी घरी दूरदर्शनसंच (टी.व्ही.) आहे; म्हणून त्या दिवसभर वा अधिक वेळ दूरदर्शनसंच पहात बसल्या आहेत, असे कधी होत नाही. त्या दिवसभरातून केवळ एकच कार्यक्रम पहातात. नंतर स्वतःचा नामजप, आध्यात्मिक उपाय आणि घरातील कामे करण्यासाठी त्या प्राधान्य देतात.
२ ई. इतरांचा विचार करणे : शारीरिक स्थितीमुळे त्या अधिक वेळ धावपळ वा चालणे करू शकत नाहीत, तरीही कधी तरी सकाळी न्याहरी करणे, दुपारचा स्वयंपाक करणे, आवश्यकता असेल, तर भांडी घासणे आदी सेवा त्या करतात. सासूबाईंना अधिक चालणे होत नसले, तरी त्या प्रतिदिन भाजी निवडणे अथवा अन्य घरगुती कामे खुर्चीवर बसून करतात. त्यांना काम करण्याचा कंटाळा येत नाही.
तसेच सौ. मनीषा त्यांच्यासाठी शिवण विभागातून बसून करण्याच्या बर्याच सेवा आणते. त्या सेवाही त्या वेळेत पूर्ण करण्याकडे त्यांचे लक्ष्य असते.
२ उ. साधनेमुळे चेहर्यात पालट होऊन चेहरा उजळणे : सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ काकांकडून गुडघेदुखीवर नामजप घेतला आहे. त्या तो नियमितपणे करत आहेत. त्यामुळे त्यांना आता गुडघेदुखीचा त्रास पुष्कळ अल्प झाला आहे. कधी तरी तो गुडघा थोडा दुखतो. पूर्वी होणारा तीव्र त्रास त्यांनी सातत्याने नामजप केल्यामुळे न्यून झाला आहे. नियमितपणे नामजप करणे आणि प्रतिदिन समष्टीसाठी दत्तमाला मंत्रपठण करत असल्यामुळे त्यांचा चेहरा उजळला आहे. त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ८.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |