संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने मांडली पाकिस्तानी हिंदु शरणार्थींची व्यथा

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – भारतात नागरिकत्व संशोधन कायद्यावरून वाद चालू आहे. अशातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत या विषयावर चर्चा झाली. या वेळी ‘राजस्थान समग्र कल्याण संस्थान’चे सदस्य सत्यनारायण शर्मा यांनी नागरिकत्व संशोधन कायद्यातील महत्त्वपूर्ण सूत्रांवर प्रकाश टाकला. शर्मा यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थींच्या भयावह परिस्थितीविषयीही परिषदेला अवगत केले.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (चित्रावर क्लिक करा)

या वेळी शर्मा म्हणाले की, दुसर्‍या देशात आश्रय घेणे अत्यंत कठीण असते. नुकत्याच जोधपूर, बाडमेर आणि कर्णावती यांसह काही भागांत विस्थापित पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. पीडितांकडे त्यांच्या देशात भूमी, संपत्ती आणि शेती होती; परंतु केवळ धर्माच्या आधारावर त्यांच्याकडून ते सर्व हिरावून घेण्यात आले. अंतत: अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात, हा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.