कॅनडातच ‘खलिस्तान’ बनवण्यात यावे !-कॅनडाचे माजी आरोग्यमंत्री उज्ज्वल दोसांझ

कॅनडाचे माजी आरोग्यमंत्री उज्ज्वल दोसांझ यांची मागणी !

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे भारतीय वंशाचे माजी आरोग्यमंत्री उज्ज्वल दोसांझ यांनी कॅनडामध्येच ‘खलिस्तान’ बनवण्याची मागणी केली आहे. ‘पंतप्रधान ट्रुडो यांचे खलिस्तान्यांशी संबंध असू शकतात’, असेही ते म्हणाले. दोसांझ मूळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत. ते वर्ष २००४ ते २०२५ या काळात आरोग्यमंत्री होते.

अल्बार्टा किंवा सास्काचेवान येथे खलिस्तान बनवा !

इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दोसांझ यांनी म्हटले की, कॅनडामध्ये शिखांची लोकसंख्या केवळ २ टक्के आहे. इतका लहान समुदाय जर खलिस्तानची मागणी करत असेल, तर त्याला कॅनडातील अल्बार्टा किंवा सास्काचेवान येथे तो बनवून द्यावा. यामुळे भारताला काय धोका असणार ?

ट्रुडो यांनी भारताच्या विरोधात पुरावे सादर करायला हवे होते !

दोसांझ पुढे म्हणाले की, पंतप्रधान ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येचा भारतावर आरोप करतांना कोणतेही पुरोवे सादर केलेले नाहीत. जर त्यांनी पुरावे सादर केले असते, तर ते अधिक चांगले झाले असते. असे केल्याने पोलीसयंत्रणा अन्वेषण पूर्ण करून आरोप सिद्ध करू शकली असती.

खलिस्तानची मागणी करणारे कॅनडातील शीख कधी भारतात गेलेच नाहीत !

खलिस्तानच्या प्रश्‍नावर ते पुढे म्हणाले की, भारतातील शीख खलिस्तानची मागणी करत नाहीत. कॅनडात राहून खलिस्तानची मागणी करणार्‍यांमध्ये सर्वाधिक संख्या अशा शिखांची आहे जे कधी भारतात गेलेलेच नाहीत.

संपादकीय भूमिका

कॅनडाकतील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुळका असलेल्या ट्रुडो या मागणीची पूर्तता करतील का ? असे केल्याने त्यांना तेथे लपून बसलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांची आणि त्यांची पाठराखण करणार्‍या खलिस्तानी समर्थकांची एकगठ्ठा मतेही मिळतील आणि खलिस्तानचा प्रश्‍न कायमचा सुटेल !