छत्रपती संभाजीनगर येथे ३०० विद्यार्थ्‍यांनी बनवल्‍या ‘इको फ्रेंडली’ श्री गणेशमूर्ती !

प्रतीकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – शहरातील ‘साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या नरसिंहपूर साधना पाटील प्राथमिक विद्यालय आणि शहरातील साने गुरुजी माध्‍यमिक विद्यालय येथे ‘इको फ्रेंडली बाप्‍पा बनवा’ (पर्यावरणपूरक) या कार्यशाळा आणि कार्यशाळेत बनवलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे प्रदर्शन नुकतेच त्‍या-त्‍या शाळेच्‍या प्रांगणात पार पडले. या कार्यशाळेत साने गुरुजी माध्‍यमिक शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी २००, तर साधना पाटील शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी १०० अशा शाडूच्‍या मातीच्‍या ‘इको फ्रेंडली’ श्री गणेशमूर्ती बनवल्‍या आहेत. साने गुरुजी शाळेचे मुख्‍याध्‍यापक धैर्यशील केरे यांच्‍या हस्‍ते कार्यशाळेचे उद़्‍घाटन झाले. या प्रसंगी कला शिक्षक सुदाम गोरे यांनी शाडू मातीपासून मूर्ती कशी सिद्ध करावी ?, हे प्रात्‍यक्षिकाद्वारे दाखवले. सामाजिक वनीकरण विभागाचे वनअधिकारी सुजित नेवसे यांनी श्री गणेशमूर्ती बनवण्‍यामागील उद्देश समजावून सांगितला. या प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाच्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी सोनिया शिंदे, वनपाल एच्.एस्. घोरपडे, वनरक्षक श्रीमती आर्.एस्. राठोड यांनी शाडू मातीचे महत्त्व पटवून दिले.