जस्टिन ट्रुडो यांची कृती वेडगळपणाची असल्याने अमेरिकेने त्यांच्या बाजूने उभे राहू नये ! – अमेरिकेतील अभ्यासक

अमेरिकेतील अभ्यासकांचा सरकारला सल्ला !

न्यूयॉर्क (अमेरिका) – भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या वेळी म्हटले की, जस्टिन ट्रुडो अशा लोकांच्या सल्ल्याने हे सर्व करत आहेत, ज्यांना खलिस्तानी चळवळ ही त्यांच्या लाभाची वाटते. जस्टिन ट्रुडो यांची ही कृती निर्लज्जपणाची आणि वेडगळपणाची आहे. अमेरिकेने या प्रकरणात ट्रुडो यांच्या बाजूने उभे राहू नये.

ट्रुडो आगीशी खेळत आहेत !

रुबिन यांनी कॅनडाकडून भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात वेगवेगळी भूमिका घेतली जात असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, कॅनडामध्ये करीमा बलुच नावाच्या महिलेची पाकिस्तानच्या साहाय्याने हत्या करण्यात आल्याचे प्रकरणही प्रलंबित आहे. त्यावर ट्रुडो यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मग हा भेदभाव का केला जात आहे ? ट्रुडो यांना दीर्घकाळात कदाचित् याचा लाभ होऊ शकेल; पण याला नेतृत्व म्हणत नाहीत. त्यांनी दायित्वाने वागायला हवे; कारण ते आगीशी खेळत आहेत.

अमेरिकेतील शिखांचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा नाही !

‘सिख्स ऑफ अमेरिका’ या संघटनेचे प्रमुख जस्सी सिंह यांनी म्हटले की, खलिस्तानी चळवळ अमेरिकेतील बहुसंख्य शिखांचे प्रतिनिधित्व करत नाही. भारतातील शीखदेखील खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देत नाहीत. आज भारतीय सैन्यात मोठ्या संख्येने शीख आहेत. ते पाकिस्तानविरुद्धही लढतात आणि चीनविरुद्धही लढतात. अमेरिकेत १० लाख शीख रहातात; पण त्यातले अगदी मोजकेच खलिस्तानची मागणी करणार्‍या आंदोलनात दिसतात.