‘आपले सरकार २.०’ प्रणाली कार्यरत !

२१ दिवसांत कार्यवाही न झाल्‍यास थेट मुख्‍यमंत्र्यांकडे तक्रार करता येणार !

मुंबई – ‘आपले सरकार १.०’ या तक्रार निवारण प्रणालीमध्‍ये पालट करून  राज्‍यशासनाने १८ सप्‍टेंबरपासून ‘आपले सरकार २.०’ ही अद्ययावत तक्रार निवारण प्रणाली चालू केली आहे. या प्रणालीवर केलेल्‍या तक्रारींवर २१ दिवसांत कार्यवाही न झाल्‍यास तक्रारदाराला थेट मुख्‍यमंत्र्यांकडे ‘१८००१२०८०४०’ या ‘हेल्‍पलाईन’ क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

याविषयीचा मार्गदर्शक शासन आदेश राज्‍यशासनाने १८ सप्‍टेंबर या दिवशी प्रसारित करण्‍यात आला आहे. जुन्‍या प्रणालीमध्‍ये जिल्‍हास्‍तरावरील केवळ जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद, पोलीस कार्यालय आणि महानगरपालिका या कार्यालयांचा समावेश होता; मात्र नवीन प्रणालीमध्‍ये जिल्‍हास्‍तरावरील क्षेत्रीय कार्यालयांविषयीच्‍या तक्रारीही स्‍वीकारल्‍या जाणार आहेत. या प्रणालीमध्‍ये ७ व्‍या आणि १४ व्‍या दिवशी संबंधित अधिकार्‍यांना स्‍मरणपत्रे जाणार आहेत. यापूर्वीच्‍या तक्रार निवारण प्रणालीमध्‍ये २ सहस्र असलेली शब्‍दमर्यादा ३ सहस्र इतकी करण्‍यात आली आहे. तक्ररीचे निराकरण झाल्‍यानंतरही अर्जदाराचे समाधान न झाल्‍यास तक्रारदाराला वरिष्‍ठ स्‍तरावर पुन्‍हा तक्रार नोंदवता येणार आहे. आधीच्‍या प्रणालीमध्‍ये ही सुविधा नव्‍हती. नवीन प्रणालीमध्‍ये अनिवासी भारतियांनाही तक्रार नोंदवता येणार आहे. नवीन प्रणालीनुसार प्रशासकीय सुधारणा आणि रचना कार्यपद्धती या उपविभागाकडून तक्रारदाराला आकस्‍मातपणे संपर्क करून तक्रार निवारणाची माहिती घेतली जाणार आहे.