अंबेजोगाई येथे होणार देशी गोवंशियांचे संवर्धन !

महाराष्‍ट्र शासनाचा गोशाळा चालवण्‍याचा उपक्रम !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – आतापर्यंत देशी गोवंशियांच्‍या संवर्धनासाठी राज्‍यशासनाकडून अनुदान दिले जात होते; मात्र या राज्‍यशासनाने देशी गोवंशियांचे जतन आणि संवर्धन करण्‍यासाठी गोशाळा चालवण्‍याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अंबेजोगाई (बीड जिल्‍हा) तालुक्‍यातील मौजे साकुड येथील ८१ हेक्‍टर भूमी पशूधन विकास मंडळाला देण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे. या ठिकाणी लालकंधारी आणि देवणी या गोवंश प्रजातीचे जतन आणि संवर्धन करण्‍यात येणार आहे.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे. पशूधनासाठी चारा, पशूखाद्य, औषधे, तसेच वीज, पाणी यासाठी प्रतिवर्षी गोशाळेला शासनाकडून ६ कोटी रुपये इतका निधी देण्‍यात येणार आहे.

लालकंधारी आणि देवणी हे देशी गोवंशियांचे मूळ जन्‍मस्‍थान मराठवाडा हेच आहे. मराठवाडामधील लातूर, बीड, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्‍ह्यांत या गोवंशियांचे अस्‍तित्‍व आहे. या वंशाच्‍या गायी दूध देण्‍यास, तर बैल शेतीकामासाठी अतिशय उपयुक्‍त आहेत. वर्ष २०१३ मध्‍ये कंधारी गायींची संख्‍या १ लाख २६ सहस्र ६०९ होती. वर्ष २०२० मध्‍ये १ लाख २३ सहस्र ९४३ इतकी अल्‍प झाली आहे. वर्ष २०१३ मध्‍ये देवणी गायींची संख्‍या ४ लाख ५६ सहस्र ७६८ इतकी होती, ती वर्ष २०२० मध्‍ये १ लाख ४९ सहस्र १५९ इतकी अल्‍प झाली आहे. या प्रजातीचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्‍ट्र शासनाने यांचे जतन आणि संवर्धन करण्‍याचा निर्णय घेतला आहे.