Ganpati : श्री गणेशाची विविध व्रते आणि स्‍तोत्रे

श्री गणेशाची ‘संकष्‍टी चतुर्थी व्रत’, ‘दूर्वा गणपति व्रत’, ‘सिद्धिविनायक व्रत’, ‘कपर्दि (कवडी) विनायक व्रत’, ‘वरदचतुर्थी व्रत’, ‘संकष्‍टहर गणपति व्रत’, ‘अंगारकी चतुर्थी व्रत’ इत्‍यादी व्रते प्रसिद्ध आहेत. ‘अथर्वशीर्ष, संकटनाशकस्‍तोत्र हेही प्रतिदिन भक्‍तीभावाने म्‍हटले, तर ६ मासांत फलप्राप्‍ती होईल’, असा निर्देश आहे. ‘गणपतीची २१, १०८ किंवा सहस्र नावे संकल्‍पपूर्वक म्‍हणून होमहवन केले असता इच्‍छित फलप्राप्‍ती होईल’, असाही निर्देश आहे. ‘गणेश उपनिषदा’त ‘विनायक मंत्र’ सांगितला आहे. त्‍याची विधियुक्‍त पूजा केल्‍यास मनोवांछित सफल होते, असा त्‍यात उल्लेख आहे. गणेशमाला मंत्र, गणेशसाम, गणेश अनुष्‍टुुभ मंत्राचा जप, हीसुद्धा प्रभावी साधने आहेत. (Ganesh, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganpati)

१. संकष्‍टी चतुर्थीचे व्रत

पांढरे तीळ घातलेल्‍या उदकाने स्नान करून मग संकल्‍प सोडून गणेशाचे ध्‍यान करावे. गोमयाने सारवलेल्‍या भूमीवर गणेशपीठ काढावे . तेथे पंचरत्नयुक्‍त कलशाची प्रतिष्‍ठापना करावी. त्‍यावर पात्र ठेवून ते वस्‍त्राने आच्‍छादावे आणि त्‍यावर गणेशाची मूर्ती ठेवावी. पुरुषसूक्‍त म्‍हणून पूजा करावी. गणेशाच्‍या २१ नामांचा उल्लेख करून २१ दूर्वा वहाव्‍यात. आरती, मंत्रपुष्‍प, २१ प्रदक्षिणा, अर्घ्‍यप्रदान आणि महाप्रसाद करावा.

‘पार्वती, अगस्‍ती, दमयंती, प्रद्युम्‍न, श्रीकृष्‍ण इत्‍यादींनी हे ‘संकष्‍ट चतुर्थी व्रत’ केले होते’, असे म्‍हटले जाते. पहिल्‍या, पाचव्‍या किंवा सातव्‍या मासामध्‍ये या व्रताचे उद्यापन करावे. त्‍या वेळी २१ ब्राह्मणांकडून ‘गणानां त्‍वा गणपतिं हवामहे । प्रियाणां त्‍वा प्रियपतिं हवामहे ।’ – अथर्ववेदातील ‘अथर्वशीर्ष’ या मंत्राचा होम करावा. ही पूजा करत असतांना ‘मन एकाग्र ठेवणे’ हे फार महत्त्वाचे आहे.

२. अंगारकी चतुर्थी व्रत

संकष्‍टीचा उपवास हा चंद्रोदय झाल्‍यानंतर सोडावयाचा असतो. प्रत्‍येक गावाचा चंद्रोदय हा भिन्‍न भिन्‍न वेळी होणारा असतो. ‘दिवसभर उपवास करून चंद्रदर्शनानंतर गणपतीचे पूजन आणि स्‍मरण करून उपवास सोडावा’, असा अंगारकी चतुर्थी व्रताचा विधी आहे.

३. दूर्वा गणपति व्रत

रविवारी विनायकी चतुर्थी आली, म्‍हणजे त्‍या दिवसापासून पुढे ६ मास किंवा श्रावण शुद्ध चतुर्थीपर्यंत हे व्रत करतात. या ६ मासात प्रत्‍येक विनायकी चतुर्थीला २१ किंवा २१ सहस्र दूर्वा किंवा तितक्‍या दुर्वांच्‍या जुड्या गणपतीला वहातात.

४. सिद्धिविनायक व्रत

उजव्‍या सोंडेच्‍या गणपतीला ‘सिद्धिविनायक’ म्‍हणतात. ‘सिद्धिविनायक’ नावाचेे व्रत आहे. शुद्ध चतुर्थीला व्रतधारकाने तीळ घातलेल्‍या पाण्‍याने स्नान करावे. सोन्‍याच्‍या किंवा चांदीच्‍या गणेश प्रतिमेची गणपति, गणराज, गणाध्‍यक्ष, विनायक, विघ्‍नहर, उमाप्रिय, रुद्रप्रिय इत्‍यादी नावांनी यथाविधी पूजा करावी. त्‍याला २१ मोदकांचा नैवेद्य समर्पण करावा. महाभारताच्‍या युद्धाच्‍या वेळी श्रीकृष्‍णाने सांगितल्‍यावरून धर्मराजाने म्‍हणजेच युधिष्‍ठिराने हे व्रत केले होते.

५. कपर्दी विनायक व्रत

हे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून चालू करतात. कपर्दी म्‍हणजे कवडी. (काशीमध्‍ये कपर्दी विनायकही आहे.)

६. वरद व्रत

या व्रताचा शुभारंभ श्रावण शुद्ध चतुर्थीपासून चालू करतात आणि भाद्रपद शुद्ध पंचमीला या दिवशी त्‍याची सांगता करतात. २१ दिवसांचे गणपति व्रत आहे. याचाही शुभारंभ श्रावण शुद्ध चतुर्थीला आणि सांगता श्रावण कृष्‍ण दशमीला करतात.

७. करक चतुर्थी व्रत

हे व्रत कार्तिक शुद्ध चतुर्थीला केवळ स्‍त्रियांनीच करावयाचे असते.

८. वटगणेश व्रत

या व्रताचा शुभारंभ कार्तिक शुद्ध चतुर्थीला करतात. त्‍याची सांगता माघ शुद्ध चतुर्थीला करतात.

९. गणेश पार्थिव पूजा व्रत

या व्रताचा शुभारंभही श्रावण शुद्ध चतुर्थीला आणि सांगता भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करतात. श्रावण शुद्ध चतुर्थीच्‍या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे आटोपल्‍यावर चांगली चिकण काळी माती घेऊन सर्व अवयवांनी पूर्ण चारभुजांनी सुशोभित, परशू इत्‍यादी आयुधे धारण करणारी रमणीय आणि पुष्‍ट अशी मूर्ती करून ती पाटावर ठेवावी. यथाविधी त्‍या मूर्तीची पूजा करावी. पूजा समाप्‍तीनंतर पद्मासन घालून आपल्‍या इच्‍छेप्रमाणे जप करावा. एकाक्षरी मंत्राचा १ लक्ष किंवा अर्धा लक्ष, षड्‌क्षरी, दशाक्षरी आणि अष्‍टाक्षरी मंत्राचा अन् २८ वर्णांच्‍या मंत्रांचाही १० सहस्र जप करावा. व्रतसमाप्‍तीनंतर ऋषिपंचमीस जपाच्‍या एकदशांश होमहवनादींनी गणेशयाग करावा. यथाशक्‍ती ब्राह्मण-सुवासिनी यांना भोजन, वस्‍त्रदान आणि महादक्षिणा देऊन संतुष्‍ट करावे. षष्‍ठीला श्री गणेश पार्थिव मूर्ती पालखीत ठेवून जलाशयाचे ठिकाणी विसर्जन करावे आणि व्रताची सांगता करावी. या व्रतामुळे इच्‍छित फलप्राप्‍ती होते.

१०. सत्‍यविनायक व्रत

हे एक काम्‍य व्रत आहे. विनायकाचा जन्‍म वैशाख पौणिमेला झाला. त्‍या दिवशी किंवा भाद्रपद शुद्ध चतुर्थी अथवा सोमवारी किंवा शुक्रवारी सत्‍यविनायकाची पूजा करतात. सत्‍यनारायणाप्रमाणे चौरंगाला चारही बाजूला केळीचे खुंट बांधून मध्‍यभागी जलाने भरलेला तांब्‍याचा कलश ठेवतात. त्‍यावर श्री गणेशाची प्रतिमा ठेवतात. त्‍याची षोड्‌शोपचार पूजा करून पोथी वाचतात. या व्रतापासून धनधान्‍य, वैभव, पुत्र, आरोग्‍य आणि आयुष्‍य यांची फलप्राप्‍ती होते.

सत्‍यविनायक व्रताची ‘ब्रह्मांड पुराणा’त कथा आहे. मणी नावाच्‍या धनिकाला चोरांनी लुटले. ही गोष्‍ट श्रीकृष्‍णाचा मित्र सुदामा याला वाटेत समजली. सुदाम्‍याने त्‍याला सत्‍यविनायकाचे व्रत करण्‍यास सांगितले. त्‍यामुळे धनिकाला त्‍याचे चोरीस गेलेले धन परत मिळाले. त्‍याने त्‍यातील अर्धे धन सुदाम्‍याला दिले. सुदाम्‍याने तेथे स्‍वतःही सत्‍यविनायक पूजा केली आणि दानधर्म केला अन् घरी आला. पहातो तो त्‍याच्‍या पडक्‍या मोडक्‍या घराचे सोन्‍याच्‍या राजवाड्यात रूपांतर झालेले होते. ही सत्‍यविनायकाची कृपा होती. ब्रह्मदेव, विष्‍णु, कृष्‍ण यांनी हे व्रत केलेले होते. चित्रबाहू राजाला या व्रतामुळे पुत्रप्राप्‍ती झाली.

११. गणेश याग

वैशाख पौर्णिमा, ज्‍येष्‍ठ शुद्ध चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी हे ४ गणेश जयंतीचे दिवस असल्‍याने या दिवशी प्राधान्‍याने गणेशयाग करतात. दूर्वा, मोदक, शमीच्‍या समिधा, साळीच्‍या लाह्या आणि तीळ ही याची हविर्द्रव्‍ये आहेत. ‘ब्रह्मणस्‍पति सूक्‍त’ आणि ‘गणपति अथर्वशीर्ष’ या दोन्‍ही सुक्‍तांच्‍या पठणाने हा याग करतात.’

(साभार: मासिक ‘वेध गणेशाचा’)