आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा अधिवक्त्यांना सल्ला !

धनंजय चंद्रचूड

मुंबई – आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो; पण स्वतःला नाही. आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून असते, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाचा अधिवक्ता संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले की,

१. प्रामाणिकपणा हा व्यवसायाचा मुख्य आधारस्तंभ आहे. आपण सर्व जण आपल्या विवेकासह झोपतो. प्रतिदिन रात्री विवेक प्रश्‍न विचारतो की, आपण एकतर सचोटीने जगू किंवा स्वत:चा नाश करू.

२. न्यायाधीश आणि अधिकवक्ते यांनी एकमेकांचा सन्मान केल्यास एकमेकांना आदर मिळतो. जेव्हा दोघांना वाटते की, दोघेही न्यायाच्या एकाच चाकाचे भाग आहेत, तेव्हाच एकमेकांचा सन्मान केला जातो.