कोळीकोड (केरळ) येथे निपाह विषाणुच्या संसर्गाच्या धोक्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद

निपाहमुळे आतापर्यंत २ जणांचा मृत्यू !

कोळीकोड (केरळ) – येथे निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे. यात ३२७ आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे. निपाहमुळे येथे आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांमध्ये एका ९ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

१. ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे महासंचालक राजीव बहल यांनी सांगितले की, निपाहमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के आहे. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण २ ते ३ टक्के इतकेच होते.

२. निपाहच्या संदर्भात केरळमधील लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचा, मुखपट्टी (मास्क) घालण्याचा आणि वटवाघळांच्या संपर्कात आलेल्या कच्च्या अन्नापासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.