गोवा : अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत अनधिकृतपणे साठवलेले मिठाई बनवण्यासाठीचे ‘खोदळ’ कह्यात

अनधिकृतपणे साठवणूक केलेले आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे ‘खोदळ’ कह्यात

पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – अन्न आणि औषध प्रशासनाने १५ सप्टेंबर या दिवशी ‘जीए ०७ एफ् ३९७७’ या क्रमांकावर नोंदणी असलेल्या वाहनातून अनधिकृतपणे साठवणूक केलेले आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे २२० किलो ‘खोदळ’ कह्यात घेतले. चालकाने कृष्णा मेटल्स, जुना स्टेशन रोड मडगाव या नावाने टपाल सिद्ध केले. त्यात सुरेशच्या नावाने ९८६०५०५८१७ हा भ्रमणभाष क्रमांक होता. तथापि त्यावर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही आणि वरील साठ्यावर दावा करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

यानंतर मंडप, नावेली येथील ‘बाँबे स्वीट मार्ट’ या दुकानावर धाड टाकून तेथून ६० किलो ‘खोदळ’ कह्यात घेण्यात आले. या दोन्ही ठिकाणच्या साहित्यांवर ते कधी सिद्ध केले, ‘बॅच क्रमांक’, कधीपर्यंत वापरू शकतो, किमान विक्री किंमत (एम्.आर्.पी.) आदी कसलीच माहिती लिहिलेली नव्हती. कह्यात घेण्यात आलेले सर्व साहित्य सुमारे ५० सहस्र रुपये किमतीचे आहे. श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. (केवळ सण जवळ आले की, अशी कारवाई न करता नेहमीच असे प्रकार उघडकीस आणायला हवेत आणि जरब बसेल असा दंड आकारायला हवा ! – संपादक)