नाशिक जिल्‍ह्यातील २१३ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा !

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – राज्‍यात यंदा अल्‍प पाऊस पडल्‍याने पिण्‍याच्‍या पाण्‍यासमवेत शेतीच्‍या पाण्‍याचा मोठा प्रश्‍नही येत्‍या काही मासांत भेडसावणार असल्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यंदा पावसाळ्‍यामध्‍ये जिल्‍ह्यातील २१३ गावे आणि वाड्या यांना सर्वाधिक ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्‍या आठवड्यात जिल्‍ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाशिक शहरासह जिल्‍ह्यात काही ठिकाणी पूरस्‍थिती निर्माण झाली. पावसामुळे स्‍थानिक स्‍तरावर पाण्‍याची उपलब्‍धता होईल आणि काही टँकर बंद होतील, अशी आशा होती; पण ग्रामीण भागात पाणी पुरवणार्‍या टँकरची संख्‍या अल्‍प होऊ शकली नाही. जिल्‍ह्यातील बहुतांश तालुक्‍यांत पाणीटंचाईची झळ तीव्र होत असून टँकरची आवश्‍यकता भासणार्‍या गावांची संख्‍याही वाढली आहे. पुरेसा पाऊस न झाल्‍यास जिल्‍ह्यात दुष्‍काळाची दाहकता वाढू शकते. जिल्‍ह्यात १५ पैकी ७ तालुके टँकरवरच अवलंबित असून सर्वाधिक पाणीटंचाई येवला आणि नांदगाव या २ तालुक्‍यांना भेडसावत आहे. येवला येथे सर्वाधिक २२, तर नांदगाव येथे १८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

संपादकीय भूमिका :

भीषण दुष्‍काळाला सामोरे जाण्‍यासाठी आतापासूनच ईश्‍वराची आराधना करा !