गोवा पर्यटन विभागाच्या ‘गोवा टॅक्सी ॲप’चे अनावरण

‘गोवा टॅक्सी ॲप’चे अनावरण करतांना डावीकडून पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार गणेश गावकर

पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा पर्यटन विभागाच्या ‘गोवा टॅक्सी ॲप’चे १५ सप्टेंबर या दिवशी अनावरण करण्यात आले. या वेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार गणेश गावकर, पर्यटन सचिव संजय गोयल आणि पर्यटन संचालक सुनील अचिपका उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यातील पर्यटक आणि रहिवासी या दोघांचे जीवनमान आणि आनंद निर्देशांक वाढवण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणे सरकारचे ध्येय आहे.

‘गोवा टॅक्सी ॲप’मुळे अपघात न्यून होण्यास आणि महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यास साहाय्य होणार आहे.’’

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘गोवा टॅक्सी ॲप’ विनामूल्य आहे. तणावमुक्त वाहतुकीचा लाभ घेता यावा, यासाठी हे ‘ॲप’ आहे. ही सेवा २४ घंटे उपलब्ध असेल.

 (सौजन्य : Goa News Hub)

पर्यटक आणि गोमंतकीय यांना याचा लाभ होईल. या सेवेसाठी परिवहन संचालकांनी संमत केलेल्या किमती आकारल्या जाणार आहेत.’’

(चित्रावर क्लिक करा)

‘गोवा टॅक्सी ॲप’ची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –

१. हे चालक नोंदणी आणि आरक्षण यांसाठी भ्रमणभाषवरील ‘ॲप’ आहे.
२. चालक, प्रवासी आणि नियंत्रण कक्ष यांसाठी वेळ अचूकपणे दर्शवली जाणार आहे.
३. वेळ, स्थान आणि मार्ग यांवर आधारित भाडे वाजवी असणार आहे.
४. ‘वॉलेट’, ‘कार्ड्स’ आणि ‘युपीआय पेमेंट’ यांद्वारे शुल्क भरता येणार आहे.