छत्रपती संभाजीनगर खंडपिठाकडून पोलीस अधिकार्यावरील गुन्हा रहित करण्याचा आदेश !
छत्रपती संभाजीनगर – एखादी व्यक्ती स्वत:च्या घरात धार्मिक प्रार्थना म्हणजे हनुमान चालिसा म्हणत असेल, तर त्यामुळे इतरांच्या भावना कशा दुखावतील ?, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने उपस्थित करत रेल्वे सुरक्षा दलातील अधिकार्यावर प्रविष्ट करण्यात आलेला गुन्हा रहित करण्याचा आदेश १२ सप्टेंबर या दिवशी दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती आर्.जी. अवचट आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी हा आदेश दिला. विशेष म्हणजे या प्रकरणात २ समाजांत तेढ निर्माण झाल्याचे सिद्ध होत नाही, असेही खंडपिठाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी येथील रेल्वेस्थानक परिसरातील सिल्क मिल्क कॉलनी भागातील रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस निरीक्षक किशोर मलकूनाईक यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मुसलमानांनी केला होता विरोध !
मलकूनाईक यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने २३ एप्रिल २०२२ या दिवशी त्यांनी त्यांच्या घरात ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावली होती. विशेष म्हणजे त्यांच्या घरात असलेल्या खिडकीच्या बाजूला एक मशीद आहे. त्यामुळे ‘त्या मशिदीत चालू असलेल्या अजानच्या वेळेत हनुमान चालिसा लावण्यात आली’, असा आरोप करून काही मुसलमानांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे मलकूनाईक यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ५०५ (१) (ब), ५०५ (क), ३४, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
संबंधित गुन्हा रहित करण्यासाठी मलकूनाईक यांनी अधिवक्ता अमरजितसिंह गिरासे यांच्या वतीने खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. ‘मलकूनाईक यांनी शांततेचा भंग केला. २ समाजांत तेढ निर्माण होईल अशी कृती केली, तसेच इतरांच्या भावना दुखावतील, असे काम केले’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. संबंधित प्रकार उल्लेख केलेल्या स्वरूपाचा नसल्याची बाजू मलकूनाईक यांच्याकडून मांडण्यात आली. त्यानंतर खंडपिठाने वरील निर्णय दिला.
संपादकीय भूमिकाप्रतिदिन मशिदीच्या भोंग्यांवरून दिवसांतून ५ वेळा अजान देऊन ध्वनीप्रदूषण केले जाते. हे भोंगे काढण्याचा न्यायालयाचा आदेश असतांनाही पोलीस भोंग्यांवर काहीच कारवाई करत नाहीत; मात्र घरात हनुमान चालिसा म्हटली म्हणून एका पोलीस अधिकार्यावरच अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला जातो, हेच पोलिसांचे शौर्य आहे का ? एवढी धमक असेल, तर पोलिसांनी मशिदींवरील भोंगे काढण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! |