१. विमानप्रवास करतांना विमानात ‘हवामान प्रतिकूल आहे, सर्वांनी आसंदीचा पट्टा बांधून शांतपणे बसावे’, अशी उद्घोषणा केली जाणे आणि त्या वेळी मनात नकारात्मक विचार येणे
‘मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात यायचे होते. तेव्हा ‘जोधपूरहून भाग्यनगरमार्गे गोवा’, असा विमानमार्ग होता. त्या वेळी हवामान अतिशय प्रतिकूल होते. पावसामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. तेव्हा विमानात ‘हवामान प्रतिकूल आहे. सर्वांनी आसंदीचा पट्टा बांधून शांतपणे बसावे’, अशी उद्घोषणा झाली. त्या वेळी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊ लागले. सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती माझ्या मनात ‘आता विमानाचा अपघात होईल’, असा विचार घालत होती.
२. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करूनही मन नियंत्रणात न रहाणे आणि त्या वेळी व्यष्टी साधना योग्य प्रकारे करण्याचे महत्त्व लक्षात येणे
मी पुनःपुन्हा ‘काही होणार नाही. गुरुदेव सर्वकाही सांभाळून घेतील’, असा सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु माझ्या मनावर नकारात्मकतेचा एवढा पगडा होता की, माझे मन माझ्या नियंत्रणात रहात नव्हते. त्या वेळी ‘प्रतिदिन व्यष्टी साधना करणे का आवश्यक आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘माझी प्रतिदिन व्यष्टी साधना योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे आता मला त्रास होत आहे’, याची मला पुष्कळ खंत वाटली.
३. प्रार्थना करून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे, ‘महर्षियान’ असा उच्चार केल्यामुळे विमानातील स्पंदने सकारात्मक होणे, मनावरील ताण निघून जाणे आणि प्रवासातील सर्व अडथळे दूर होणे
त्यानंतर मी थोडा वेळ प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकली आणि प्रार्थना केली, ‘हे पंचमहाभूतांनो, हे पंचतत्त्वांनो, आपणच या प्रतिकूल हवामानात पालट करून ते चांगले करावे. हे इंद्रदेवते, ‘आता पावसाची किती आवश्यकता आहे ?’, हे आपणच पहावे. हे वरुणदेवते, अग्निदेवते आणि वायुदेवते, विमानाचे उड्डाण होण्यासाठी आवश्यक असलेले निर्देश मिळण्यात ज्या अडचणी येत आहेत, त्यांचे निवारण तुम्हीच करावे. मला गुरुचरणी राहू द्यावे.’ मी विमानात मानसरित्या ३ उदबत्त्या लावल्या आणि जयघोष केला.
नंतर मी डोळे बंद करून ‘महर्षियान’, असा पुनःपुन्हा उच्चार केला. नंतर मला ‘स्वर्गातून देवता विमानावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले. त्यामुळे माझ्या मनावरील सर्व ताण क्षणात निघून गेला. त्यानंतर प्रवासातील सर्व अडथळे दूर झाले. यावरून ‘महर्षियान’, असा उच्चार केल्यामुळे विमानातील स्पंदने सकारात्मक झाली’, असे मला जाणवले.’
– श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत रोड, राजस्थान. (१९.३.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |