पाऊस न आल्यास दूधगंगा धरणातून पाणी सोडण्यात यावे ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर

कालवा सल्लागार समितीची बैठक

दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर

कोल्हापूर – या वर्षी पुरेसा पाऊस न आल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील गुरांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवता येऊ शकेल. यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना करून पाऊस न आल्यास खरीपाच्या पिकांना धोका पोचू नये, यासाठी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार दूधगंगा आणि अन्य धरणांतून पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी आणि तुळशी या धरण प्रकल्पांच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यांसाठी पाण्याचा वापर अल्प करून पाण्याची बचत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नद्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी, तसेच पूर नियंत्रणासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण करा. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राजाराम बंधार्‍याला केलेल्या बरग्यांच्या व्यवस्थेप्रमाणे इतर बंधार्‍यांनाही उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या वेळी केल्या.