पुणे – पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी १६ लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेतांना त्यांना पकडण्यात आले होते. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू करण्यात आले होते. या प्रकरणी पुण्यातील ४९ वर्षीय डॉक्टरांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात आशीष बनगिनवार दोषी आढळल्याने त्यांची सेवेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठातांच्या विरोधात आंदोलन छेडले होते.
काय आहे प्रकरण ?
१. तक्रारदार यांचा मुलगा नीट परीक्षा २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम्.बी.बी.एस्.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या फेरीमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘इन्स्टिट्यूशनल कोटा’मधून निवड झाली होती.
२. या निवड सूचीच्या आधारे तक्रारदार हे लोकसेवक आशीष बनगिनवार यांना मुलाचे एम्.बी.बी.एस्.च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी भेटले होते. नियमानुसार प्रतिवर्षाचे प्रवेश शूल्क २२ लाख ५० सहस्र रुपये असते; मात्र डीन डॉ. आशीष यांनी या व्यतिरिक्त प्रवेशासाठी त्यांच्याकडे अधिकच्या १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याविषयी तक्रारदार यांनी पुणे ए.सी.बी.कडे तक्रार दिली होती.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांची केवल हकालपट्टी नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यासच इतरांवर जरब बसेल ! वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर अध्यापक मुलांना कधी घडवू शकतील का ? |