पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील २ चौक्यांवर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने केलेल्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार, तर ४० जण घायाळ झाले. पाक सैन्याच्या माध्यम शाखेने मात्र ४ सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. अन्य एका वृत्तानुसार ९० सैनिकांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या वेळी १२ आतंकवादीही ठार झाले, तसेच मोठ्या प्रमाणात आतंकवादी घायाळ झाले. या आतंकवादी संघटनेने दावा केला आहे की, पाकच्या सीमेवरील काही गावे कह्यात घेण्यात आली आहेत; मात्र पाक सैन्याने हा दावा फेटाळला आहे.
पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्या सैन्यात चकमक
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तोरखम येथे पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्या सैन्यामध्ये गोळीबार करण्यात आला. ‘यात जीवित हानी झाली नाही’, असे पाक सैन्याकडून सांगण्यात आले. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकच्या सैन्याने अफगाणी सैन्याधिकार्यांशी या संदर्भात संपर्क केला आहे. तालिबान सरकारने म्हटले की, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पावले उचलली जात आहेत.