खलिस्‍तानी आतंकवाद संपवण्‍यासाठी ब्रिटन भारतासमवेत ! – पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन – खलिस्‍तानी आतंकवाद संपवण्‍यासाठी ब्रिटन भारत सरकारच्‍या समवेत आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितले. खलिस्‍तान्‍यांनी भारताच्‍या लंडनमधील उच्‍चायुक्‍तालयाला लक्ष्य केले होते. याविषयी पंतप्रधान ऋषी सुनक यांना विचारले असता ते म्‍हणाले की, हिंसक कारवाया निपटण्‍यासाठी ब्रिटीश पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत. फुटीरतावादी विचारधारांचा सामना करणे, हे सरकारचे कर्तव्‍य असून ते मी गांभीर्याने घेतले आहे.

‘जगासमोरील सर्वांत मोठ्या आव्‍हानांना तोंड देण्‍यासाठी आम्‍ही ‘जी-२०’ च्‍या अध्‍यक्षपदाच्‍या माध्‍यमातून भारतासमवेत एकत्र काम करू. वर्ष २०२३ हे भारतासाठी महत्त्वाचे वर्ष आहे’, असेही त्‍यांनी सांगितले.

हिंदु असल्‍याचा अभिमान ! – सुनक

ऋषी सुनक यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले, ‘माझी पत्नी भारतीय आहे आणि एक अभिमानी हिंदु म्‍हणून माझे भारताशी अन् भारतातील लोकांशी नेहमीच चांगले नाते राहील. मला माझ्‍या मूळ भारतीयत्‍वाचा आणि भारताशी असलेल्‍या माझ्‍या संबंधाचा पुष्‍कळ अभिमान आहे.’

संपादकीय भूमिका 

ऋषी सुनक यांनी असे केवळ म्‍हणू नये, तर प्रत्‍यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते ! गेल्‍या काही काळात ब्रिटनमध्‍ये खलिस्‍तान्‍यांनी केलेल्‍या भारतविरोधी घटनांच्‍या संदर्भात ब्रिटनने त्‍यांच्‍या विरोधात कोणतीही ठोस कठोर कारवाई केली नाही, हेही लक्षात घ्‍यायला हवे !