वयस्‍कर व्‍यक्‍तींनी आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी ?

आयुर्वेदामध्‍ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्‍या आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी, याविषयी प्रथमतः मार्गदर्शन केलेले आहे. ते नियम जर आपण पाळत असू, तर स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित रहाणार आहे. वयस्‍कर व्‍यक्‍तींना बर्‍याच छोट्या-मोठ्या आरोग्‍याच्‍या तक्रारी या उद़्‍भवतच असतात. या वयात शरिराची पुष्‍कळ प्रमाणात झीज होत असते; परंतु आपण जर योग्‍य काळजी घेतली, तर म्‍हातारपणही आपण आरोग्‍यमय घालवू शकतो. आजच्‍या लेखामध्‍ये ‘वयस्‍कर व्‍यक्‍तींनी स्‍वतःच्‍या आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी ?’, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

१. वयाच्‍या अवस्‍थेनुसार घ्‍यावयाची काळजी

वयाच्‍या अवस्‍थेनुसार आपल्‍या शरिरात दोषांचे अधिक्‍य असते. लहानपणी कफ प्रवृत्ती प्रबळ म्‍हणून लहान मुलांना सर्दी खोकल्‍यासारखे कफाचे आजार लगेच होतात. मध्‍यम वयात पित्त प्रवृत्ती प्रबळ असते; म्‍हणून अम्‍लपित्तसारखे आजार होतात, तर म्‍हातारपणी वात प्रवृत्ती प्रबळ होते; म्‍हणून सांधेदुखी, मलबद्धता, पचन यांचे त्रास होत असतात, म्‍हणजेच काय वाताची जर योग्‍य प्रकारे आपण काळजी घेतली, तर म्‍हातारपणात होणार्‍या बर्‍याचशा तक्रारी या आटोक्‍यात राहू शकतात.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

२. शरिरात वाढणार्‍या वाताला आटोक्‍यात ठेवण्‍यासाठी मालीश आवश्‍यक !

आपण प्रारंभीच्‍या लेखांमध्‍ये वाताचे गुण बघितले होते. जसे की, वात रुक्ष म्‍हणजे खरखरीत, कोरडा, सूक्ष्म, थंड, चंचल अशा स्‍वभावाचा आहे. जेव्‍हा वात वाढतो, तेव्‍हा शरिरात कोरडेपणा वाढतो. त्‍वचेवर सुरकुत्‍या पडायला लागतात. सांध्‍यांमध्‍ये कोरडेपणा निर्माण झाल्‍यामुळे सांधेदुखी चालू होते. ही रुक्षता न्‍यून करण्‍यासाठी संपूर्ण शरिराला कोमट तिळाच्‍या तेलाने मालीश करावी. मालीश अगदी हलक्‍या हाताने करायला हवी, पुष्‍कळ जोर लावून करू नये. इथे केवळ शरिरात तेल जिरवणे, हा उद्देश अपेक्षित आहे. तेल हे स्निग्‍ध गुणाचे असल्‍यामुळे शरिरात वाढणार्‍या वाताला आटोक्‍यात ठेवते. प्रतिदिन आंघोळीपूर्वी हाताने सर्व शरिराला आणि सांध्‍यांना नियमित तेल लावल्‍यास सांधेदुखी आटोक्‍यात रहाते. उतारवयात शरिराची झीज अधिक होत असते. मालीश केल्‍यामुळे रक्‍ताभिसरण सुधारते, भूक वाढून पचन सुधारते, शरिरातील सर्व ग्रंथींचे कार्य सुधारते आणि परिणामी शरिराची झीज भरून काढण्‍यास साहाय्‍य होते.

३. कोमट पाण्‍याने अंघोळ करावी !

अंघोळ कोमट पाण्‍यानेच करावी. ‘बरेच जण थंड पाण्‍यानेच अंघोळ करणेच चांगले’, असे मानतात; पण थंड पाण्‍यामुळे वात वाढण्‍याला वाव मिळतो, म्‍हणून वयाच्‍या चाळीशी नंतर सर्वांनी कोमट पाण्‍यानेच अंघोळ करायला हवी.

४. गार वारे टाळण्‍यासाठीची उपाययोजना

वयस्‍कर व्‍यक्‍तींनी गार वार्‍याच्‍या संपर्कात येणे टाळायला हवे. गतीने फिरणार्‍या पंख्‍याखाली झोपणे टाळावे. प्रवास करतांना कानाला खिडकीतून थेट हवा लागणार नाही, याची काळजी घ्‍यावी. अशा वेळी कानात कापूस घालावा अथवा कानाला रूमाल बांधावा.

५. कोणते व्‍यायाम करावेत ?

पुष्‍कळ चालणे, शारीरिक आणि मानसिक दगदग टाळावी. साधी योगासने, दिवसभरात २० ते २५ मिनिटे चालणे, असे साधे आणि सोपे व्‍यायाम करावेत. प्राणायाम अवश्‍य करावा.

६. मलबद्धतेच्‍या तक्रारी न्‍यून करण्‍यासाठी उपाय

शरिरात पाण्‍याचे अधिक शोषण झाल्‍यामुळे मलबद्धतेच्‍या तक्रारी म्‍हातारपणात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. बरेच जण पोट साफ होण्‍यासाठी प्रतिदिन सर्रास औषधे घेत असतात. प्रारंभीला अर्धी गोळी परिणाम करते; परंतु नंतर एक गोळी, कालांतराने दोन गोळ्‍या असे औषध वाढवत नेले, तरीसुद्धा पोट साफ न होण्‍याची तक्रार तशीच रहाते. पोट साफ होण्‍याचे औषध आठवड्यातून एकदा घेतल्‍यास हरकत नाही; पण प्रतिदिन पोट साफ होण्‍याचे औषध घेण्‍याची सवय अयोग्‍य आहे. यावर साधा उपाय म्‍हणून रात्री झोपतांना अर्धा कप गरम दुधामध्‍ये २ चमचे साजूक तूप घालून प्‍यावे. त्‍यामुळे मलबद्धतेची तक्रार आटोक्‍यात रहाते. दुसरा उपाय, म्‍हणजे रात्री झोपतांना ८ ते १० मनुका पाण्‍यात भिजवून सकाळी त्‍या चावून चावून खाव्‍यात. तरीसुद्धा मलबद्धतेचा त्रास कायम राहिल्‍यास वैद्यांच्‍या सल्‍ल्‍याने बस्‍ती चिकित्‍सा करावी.

७. अन्‍य उपाय

शरिराची झीज भरून काढण्‍याकरता प्रतिदिन सकाळी एक चमचा च्‍यवनप्राश खावे. जेवणाच्‍या वेळा ठरवून त्‍या वेळी गरम आणि ताजे अन्‍न घ्‍यावे. शिळे अन्‍न अजिबात खाऊ नये. आहारामध्‍ये कढण, सूप असावे. त्‍याला लसणाची किंवा हिंग-जिर्‍याची फोडणी दिली, तर पोटातील वायू (गॅस) न्‍यून होतो. रात्री उशिरा जेवू नये. चहा-कॉफीसारखे पेय न्‍यून घ्‍यावे किंवा टाळल्‍यास उत्तम. दिवसभरात कोमट पाणी प्‍यावे. प्रत्‍येक वेळी कोमट पाणी पिणे शक्‍य नसल्‍यास उकळून गार केलेले पाणी प्‍यावे.

७ अ. उतारवयात झोप न्‍यून होते किंवा गाढ झोप लागत नाही. अशा वेळी झोपण्‍यापूर्वी पायांना तेल चोळावे.

७ आ. स्‍वतःला चालू असलेली औषधे ही नियमित आणि वैद्यांच्‍या सल्‍ल्‍याने घ्‍यावीत. कोणताही आजार वा दुखणे अंगावर काढू नये.

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर, पुणे (५.९.२०२३)