ठाणे येथे राजकीय पक्षांकडून दहीहंड्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ६ सप्‍टेंबर (वार्ता.) – ठाणे शहरात भाजप, शिवसेना आणि मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांनी मोठमोठ्या थरांच्‍या दहीहंड्यांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके घोषित केली आहेत.

१. ठाणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या क्षेत्रात सार्वजनिक २८४ आणि खासगी १ सहस्र १४७ अशा एकूण १ सहस्र ४३१ दहीहंड्या फोडण्‍यात येणार आहेत. त्‍यामुळे येथे ३ सहस्रांहून अधिक पोलीस तैनात करण्‍यात आले आहेत.

२. ठाणे शहरात टेंभी नाक्‍यावर आनंद दिघे यांनी सर्वप्रथम चालू केलेली दहीहंडी ही मानाची मानली जाते; मात्र येथे सध्‍या शिवसेनेचे (शिंदे गटाचे) वर्चस्‍व आहे. या मानाच्‍या दहीहंडीला जांभळी नाक्‍यावरून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून आव्‍हान दिले आहे.

३. भाजपचे शिवाजी पाटील यांच्‍या ‘स्‍वामी प्रतिष्‍ठान’ची दहीहंडी डॉ. घाणेकर नाट्यगृह चौकात, तर कृष्‍णा पाटील यांची गोकुळ दहीहंडी कॅसलमील चौकात असणार आहे. मनसेची भगवती शाळेच्‍या मैदानात आणि आमदार प्रताप सरनाईक यांची दहीहंडी वर्तकनगर येथील झेडपी मैदानात असणार आहे. कृष्‍णा पाटील यांच्‍या गोकुळ दहीहंडीत ५१ लाखांची पारितोषिके आहेत, तर आमदार प्रताप सरनाईक यांच्‍या ‘संस्‍कृती युवा प्रतिष्‍ठान’च्‍या हंडीत २१ लाख आणि रवींद्र फाटक यांच्‍या ‘संकल्‍प प्रतिष्‍ठान’च्‍या दहीहंडीत १० थरांना ११ लाखांचे पारितोषिक ठेवण्‍यात आले आहे.

४. टेंभी नाका आणि जांभळी नाका येथेही लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्‍यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर राजकारणाचा विचार समोर ठेवून उत्‍सव साजरे करण्‍यापेक्षा ते धर्मशास्‍त्रानुसार साजरे होण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !