वक्फ कायदा रहित करा !

कर्नाटकातील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून वक्फ कायदा रहित करण्याची मागणी केली आहे.

यत्नाळ यांनी पत्रात लिहिले आहे की, वक्फ बोर्ड देशभरामध्ये प्रमुख भूमी कह्यात घेण्यासाठी त्याला असणार्‍या अधिकाराचा उपायोग करत आहे. हा वक्फ कायदा वक्फ संपतीचे व्यवस्थापन करण्यासाठी बनवण्यात आला होता आणि अशा प्रकारचा कायदा अन्य धर्मियांसाठी बनवण्यात आला नाही. वर्ष २०१३ मध्ये यात सुधारणा करून वक्फ बोर्डाला अधिक अधिकार देण्यात आले. सध्या या वक्फ बोर्डाकडे ८ लाख ५४ सहस्र ५०९ मालमत्ता आहेत. त्या ८ लाख एकर भूमीत पसरलेल्या आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचा वक्फ नावाचा प्रकार तुर्कीए, लिबिया, इजिप्त, सूडान, लेबनॉन, सीरिया, जॉर्डन, ट्युनिशिया आणि इराक यांसारख्या इस्लामी देशांमध्ये नाही. त्यामुळे वक्फ बोर्डाला वक्फ कायद्याद्वारे देण्यात आलेले अधिकार रहित केले पाहिजेत.

संपादकीय भूमिका

भाजपच्या आमदाराने या सूत्राचा सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !