निर्माल्य कंटेनर, कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांच्या संख्येत वाढ करणार !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय  

पुणे – श्री गणेशमूर्तींचे विसर्जन यंदाही नदीत करण्यास पुणे महानगरपालिकेने मनाई केली आहे. मूर्तीविसर्जनाला पर्याय म्हणून महानगरपालिकेने कृत्रिम हौद, मूर्तीसंकलन केंद्र तसेच निर्माल्य संकलन केंद्र यांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. अधिकाधिक नागारिकांनी पाण्याच्या टाक्यांमध्ये विसर्जन करावे, तसेच मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती द्यावी, यासाठी महानगरपालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जनजागृतीही केली जाणार आहे. (केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात, हे संतापजनक आहे ! – संपादक)

वर्ष २०२२ मध्ये गणेशोत्सवाच्या काळात महानगरपालिकेने क्षेत्रीय कार्यलयांच्या अंतर्गत ३५९ लोखंडी टाक्या उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात अनुमाने २०९ टाक्यांची वाढ केली असून ही संख्या आता ५६८ असणार आहे, तर मूर्ती संकलन केंद्रांची संख्या गतवर्षी २१६ होती. ती यंदा २५२ असणार आहे. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या निर्माल्य संकलनासाठी २०६ कंटेनर होते. ही संख्या यंदा २५६ असणार आहे. २२ प्रमुख घाटांवर अनुमाने ४२ पाण्याचे हौद उभारण्यात येणार असून तेथेही मूर्ती विसर्जन करता येणार आहे.

१. सर्वाधिक निर्माल्य कंटेनर हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात असून तेथे ३६ कंटेनर असतील. त्यापाठोपाठ सिंहगड रोड ३४, वारजे कर्वेनगर येथे २४ कंटेनर असणार आहेत.

२. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ३९ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापाठोपाठ हडपसर-मुंढवा येथे ३६, सिंहगड रस्ता येथे २५ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत.

३. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ७७ लोखंडी टाक्या असतील. त्यापाठोपाठ वारजे-कर्वेनगर येथे ७१, कोथरूड-बावधन येथे ६७, कोंढवा येवलेवाडी येथे ५८, कसबा-विश्रामबाग येथे ५७, बिबवेवाडी येथे ५४ लोखंडी टाक्या उपलब्ध असणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • ‘गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’ असे गृहीत धरूनच अशास्त्रीय पद्धतीने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ बांधले जाणे, अयोग्य आहे. मूर्तीविसर्जनाने पाण्याचे प्रदूषण होत नाही, हे अनेकदा सिद्ध होऊनही असा अशास्त्रीय निर्णय प्रशासनाने घेऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
  • शाडूमातीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रयत्न करून वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन देेणे आवश्यक असतांना असे धर्मद्रोही निर्णय घेणे संतापजनक होय. यासाठी हिंदूंनी अशा गोष्टींना संघटितपणे वैध मार्गाने विरोध करायला हवा !
  • कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा पालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जनास प्रोत्साहन दिल्यास सर्वांवरच श्री गणेशाची कृपा होईल !