नाशिक येथे लाच घेतांना जी.एस्.टी. अधिकार्‍यांसह ४ जणांना अटक ! 

भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग !

प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) अधिकार्‍यांसह विविध विभागांतील ३ अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराचा विज्ञापन चित्रीकरणाचा व्यवसाय असून त्याचे जी.एस्.टी. भरणे बाकी होते. जी.एस्.टी. अधिकारी जगदीश पाटील यांनी ‘चित्रीकरणाची वाहने ‘जी.एस्.टी.’चा दंड न भरता सोडून देतो’, असे सांगत ४० सहस्र रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाच स्वीकारतांना पाटील यांना पाथर्डी वस्तू आणि सेवाकर कार्यालयात अटक केली.

पोलीस अधिकार्‍यासह पोलीस शिपायास लाच घेतांना अटक !

कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांसह पोलीस शिपाई कुमार जाधव यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली. तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये गुन्हा नोंद न करण्यासाठी तक्रारदाराकडे १० सहस्र रुपयांची लाच मागण्यात आली होती. (लाच घेणारे असे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! – संपादक)

मोटर वाहन निरीक्षकासह एकास लाच घेतांना अटक ! 

पालघर जिल्ह्यातील तलासरी उपप्रादेशिक पडताळणी नाक्यावर मोटर वाहन निरीक्षक संशयित निलोबा तांदळे आणि खासगी व्यक्ती सुनील भोईर यांना ३०० रुपयांची लाच घेतांना पथकाने अटक केली. (असे प्रकार प्रतिदिन होत असल्याने वाहन निरीक्षकांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)