मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला ! – राज ठाकरेे

राज ठाकरे यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा !

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

जालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची क्षमा मागावी. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला. सत्तेत असतांना या विषयावर बोलायचे नाही आणि विरोधात गेल्यावर मराठा आरक्षणाची मागणी करायची, असेच आजपर्यंत राजकारणी करत आले आहेत. राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ सप्टेंबर या दिवशी येथे केेले.

राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ४ सप्टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. या बंदलाही मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. आडगाव जावळे येथे राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा थांबवण्यात आला होता. या वेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते !- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाविषयी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. कायदेशीर बाजूही समजून घेतल्या पाहिजेत. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका; कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत.