पुणे येथे १ सहस्र ७०० वाहनचालकांचा दंड ‘लोक अदालती’द्वारे न्‍यून !

पुणे – वाहतूक नियमभंगाच्‍या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी ‘साहाय्‍य केंद्रा’ची उभारणी केली आहे. आतापर्यंत १ सहस्र ७०० वाहनचालकांचा दंड न्‍यून करण्‍यात आला आहे. हे ‘साहाय्‍य केंद्र’ ८ सप्‍टेंबरपर्यंत कार्यान्‍वित रहाणार आहे. पुणे जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्‍टेंबर या दिवशी ‘लोक अदालती’चे आयोजन केले आहे.

प्रलंबित खटले तडजोडीने संपवणे, थकीत दंडाची रक्‍कम अल्‍प करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करणे यांसाठी पोलिसांची पथके सिद्ध आहेत. ‘साहाय्‍य केंद्रा’त थकीत दंड अल्‍प करून घेण्‍यासाठी येणार्‍या वाहनचालकांनी ‘आधार कार्डा’ची छायांकित प्रत आणावी, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पुणे जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्‍यात आले आहे.