बावळाट येथे १८ गोवंशियांची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली !

इसाक नेसरीकर आणि तौसिफ नेसरीकर यांना नोटीस देऊन पोलिसांनी सोडले !

सावंतवाडी – अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी येथील पोलिसांनी आजरा, कोल्हापूर येथील इसाक अब्दुल नेसरीकर आणि तौसिफ नेसरीकर यांना कह्यात घेतले. ही कारवाई २ सप्टेंबरच्या मध्यरात्री १ वाजता सावंतवाडी-आंबोली मार्गावरील बावळाट तिठा येथे करण्यात आली.
कुडाळ येथून आंबोलीच्या दिशेने गोवंशियांची वाहतूक केली जात असल्याची माहिती काही गोप्रेमींनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बावळाट येथे सापळा रचून ही कारवाई केली. या वेळी पोलिसांनी गोवंशियांची वाहतूक करणार्‍या ट्रकची तपासणी केली असता त्यात ११ गायी, ५ बैल आणि २ वासरे, असे एकूण १८ गोवंश सापडले. या कारवाईत पोलिसांनी ट्रक कह्यात घेतला असून गोवंशियांना फोंडा, गोवा येथील एका गोशाळेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील नेसरीकर यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

संपादकीय भूमिका 

गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !