‘लिव्ह इन रिलेशनशिप’द्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

जोडीदाराला फसवून परव्यक्तीसमवेत शारीरिक संबंध ठेवणे, हे पुरोगामी समाजाचे लक्षण मानले जात आहे !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ ही पद्धत निरोगी आणि सामाजिक स्थैर्य यांचे लक्षण म्हणता येणार नाही. विवाहसंस्थेमुळे जी सुरक्षितता आणि स्थैर्य मिळते, ते ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये मिळू शकत नाही. काही दिवसांनी साथीदार पालटण्याची ही पद्धत क्रूर म्हणावी लागेल. त्याद्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर आदेश देतांना म्हटलेे. ‘लिव्ह इन रिलेशनशीप’(‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे) मध्ये रहाणार्‍या एका महिलेने तिच्या साथीदारावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

हे प्रकरण सुनावणीसाठी उच्च न्यायालयात आल्यावर न्यायालयाने आरोपीला जामीन देतांना वरील विधान केले आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनशिप या देशात विवाहसंस्था कालबाह्य झाल्यानंतरच सामान्य मानली जाईल. असे अनेक विकसित देशांमध्ये झाले आहे. त्या देशांसमोर विवाहसंस्थेचे रक्षण करणे, ही मोठी समस्या  आहेे. भविष्यात आपल्यासाठी ही मोठी समस्या निर्माण होत आहे. विवाह झाल्यानंतर आणि ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ नातेसंबंधांमधील स्त्री किंवा पुरुष यांच्याकडून स्वतःच्या जोडीदाराला किंवा साथीदाराला फसवून परव्यक्तीसमवेत शारीरिक संबंध ठेवणे, हे पुरोगामी समाजाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. (‘पुरोगामी’ म्हणजे काय असते, हेच न्यायालयाने यातून स्पष्ट केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

काय आहे प्रकरण ?

उत्तरप्रदेशातील सहारणपूरचा रहिवासी असलेला तरुण आणि त्याची १९ वर्षांची प्रेयसी तरुणी हे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहात होते. यामुळे तरुणी गर्भवती झाली होती. असे असतांनाही तिने तरुणाच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली. ‘तरुणाने विवाहाचे वचन दिले होते; मात्र आता तो विवाह करण्यास सिद्ध नाही’, अशी तक्रार तरुणीने केली. यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली.